कल्याणीनगर येथे घरी येऊन शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने दहा लाखांच्या खंडणीसाठी पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांचे अपहरण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. गस्तीवरील पोलिसांनी पहाटे हटकल्यानंतर मोटार घेऊन पळालेला शिक्षक विद्यार्थ्यांला वाघोली येथे सोडून पसार झाला आहे. या विद्यार्थ्यांने एका फोनवरून आईला कळविल्यानंतर त्याला घरी नेण्यात आले आहे. या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाकडून फरार शिक्षकाचा शोध सुरू आहे.
याबाबत कल्याणीनगर येथे राहणाऱ्या मुलाच्या आईने तक्रार दिली आहे. त्यावरून शिक्षक प्रसुन गुप्ता (वय ३०) याच्या विरोधात खंडणी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलाच्या वडिलांचा सुरत येथे साडी विक्रीचा व्यवसाय आहे. हा मुलगा कल्याणीनगर येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाचवीत शिकतो. गुप्ता याने ‘घरी येऊन शिकवणीचे काम केले जाईल,’ अशी जाहिरात शाळेसमोर लावली होती. त्यावरून पीडित मुलगा व इतरांनी गुप्ताला घरी येऊन शिकवणीसाठी नेमले होते. त्यानुसार गुप्ता हा मुलाच्या घरी रात्री सात ते साडेआठ दरम्यान शिकवणी घेत होता. शिकवणीसाठी येताना दररोज तो तोंडाला मास्क लावून यायचा. त्याबाबत गुप्ताला विचारण्यात आले असता धार्मिक कारणामुळे मास्क लावत असल्याचे सांगत होता.
गुप्ता हा पीडित मुलास कधी-कधी बाहेर घेऊन वही, पेन देत असे आणि त्यानंतर त्याला घरी आणून सोडत. असे करून त्याने मुलाच्या आईचा विश्वास संपादन केला होता. गुप्ता शिकवणीस येताना दररोज मोटारसायकलवर येत असे. पण, मंगळवारी रात्री तो पांढऱ्या रंगाची मोटार घेऊन आला. शिकवणी संपल्यानंतर मुलास वही देण्याच्या बहाण्याने बाहेर घेऊन गेला तो परत आलाच नाही. त्यानंतर त्याने मुलाच्या आईला रात्री आठ वाजून पन्नास मिनिटांनी फोन करून ‘ उद्या पर्यंत दहा लाख द्या, नाहीतर मुलास ठार मारेल’ अशी धमकी दिली. मुलास घेऊन तो रात्री नगर रस्ता परिसरात फिरला. नंतर मांजरी रेल्वे क्रॉसिंगजवळ मोटार उभी करून थांबला होता. रात्रीच्या गस्तीवर असलेले हडपसर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल यांना या मोटारीचा संशय आल्याने त्यांनी चौकशी केली. गुप्ताला खाली उतरण्यास सांगितले. मोटारीतून उतरतो असे म्हणून गुप्ता मोटार चालू करून पळाला. त्यामुळे बीट मार्शलनी पोलीस नियंत्रण कक्ष व इतर मार्शलला मोटारीची माहिती दिली. पहाटे पाच ते सहाच्या सुमारास गुप्ता याने पीडित मुलास वाघोली परिसरात सोडले व तो पसार झाला. या मुलाने येथील एका घरात जाऊन आईला फोन केला. या घटनेची माहिती मुलाच्या आईने दिली. पोलिसांना सोबत घेऊन मुलाच्या आईने मुलाला वाघोली येथे जाऊन ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील हे अधिक तपास करीत आहेत. गुप्ताच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.