23 February 2019

News Flash

शिक्षकांचे वेतन थकवता येणार नाही

राज्यातील विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन गेले अनेक महिने थकले आहे.

न्यायालयाचे आदेश

पैसे नसल्याचे कारण देत शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थकवता येणार नाही, असा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. ‘महिन्याच्या दहा तारखेच्या आत वेतन झाले पाहिजे,’ असेही या आदेशात न्यायालयाने म्हटले आहे.

राज्यातील विनाअनुदानित तंत्रशिक्षण संस्थांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन गेले अनेक महिने थकले आहे. वेतन देण्यासाठी पुरेसा निधी नसल्याचे कारण संस्थाचालकांकडून देण्यात येते. जळगाव येथील एका महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्याप्रकरणी ‘टीचर्स असोसिएशन फॉर नॉन एडेड पॉलिटेक्निक्स’ (टॅफनॅप) या संघटनेने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. संस्थेची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे वेतन देणे शक्य होऊ शकले नाही, अशी बाजू या महाविद्यालयाने औरंगाबाद खंडपीठासमोर मांडली होती. या प्रकरणी ‘संस्थेची परिस्थिती नसल्याचे कारण देत शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे वेतन थकवता येऊ शकत नाही. वेतन दरमहा दहा तारखेच्या आत करण्यात यावे,’ असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. एस. एस. शिंदे आणि संगीतराव पाटील यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. ‘विनाअनुदानित तत्त्वावर एखादे महाविद्यालय सुरू केले जाते, तेव्हा संस्थेची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याचे प्रतिज्ञापत्र शासनाला दिले जाते. प्राध्यापकांच्या सेवेचा नियमानुसार लाभ घेऊन वेतन देण्याची वेळ येते तेव्हा संस्थेची परिस्थिती हालाखीची असल्याचे कारण सांगू शकत नाही. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना महिन्याच्या दहा तारखेच्या आत वेतन मिळाले पाहिजे,’ असे उच्च न्यायालयाने त्यांच्या निकालात नमूद केले आहे

First Published on May 10, 2016 12:33 am

Web Title: teacher salaries will not pending