गेले काही दिवस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी होत चाललेल्या शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नवसंजीवनी दिली आहे. इंटिग्रेटेड अभ्यासक्रम, परदेशी विद्यापीठांशी करार, नवे प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू केले आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठात आता ‘स्कूल ऑफ एज्युकेशन’ सुरू होणार असून नुकत्याच झालेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली आहे.
गेली काही वर्षे शिक्षणशास्त्र विषयातील अभ्यासक्रमांना (बीएड, एमएड) मिळणारा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी होऊ लागला होता. मात्र, आता पुन्हा एकदा नवे अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांना शिक्षणशास्त्र विषयाकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न विद्यापीठाकडूनच केले जात आहेत. या वर्षीपासून बीएड अभ्यासक्रम दोन वर्षांचे करण्यात आले आहेत. पदवीनंतर दोन वर्षांचा अभ्यासक्रम असल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यापीठाने यावर उत्तर शोधले आहे. शिक्षणशास्त्रातील इंटिग्रेटेड अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू करण्यात येणार आहेत. शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आता विज्ञान शाखेतील पदवी अभ्यासक्रमाबरोबरच शिक्षणशास्त्र विषयाचेही प्रशिक्षण मिळणार आहे. बीएससी बीएड असा नवा अभ्यासक्रम आता सुरू होणार आहे. बारावीनंतर चार वर्षे कालावधीचा हा अभ्यासक्रम असणार आहे. या शैक्षणिक वर्षांपासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. काही महाविद्यालयांनीही इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाचा पर्याय स्वीकारला आहे.
शिक्षणशास्त्र विषयातील संशोधन आणि विविध अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाने आता जर्मनीतील गॉटिन्जन्ट विद्यापीठाशी करार केला आहे. या करारानुसार गॉटिन्जन्ट विद्यापीठातील शिक्षक दोन वर्षे कालावधीसाठी पुणे विद्यापीठात शिकवण्यासाठी येणार आहेत. शिक्षणशास्त्रातील एकत्रित संशोधन प्रकल्पही दोन्ही विद्यापीठांच्या सहकार्याने राबवण्यात येणार आहेत. विद्यापीठातील शिक्षणशास्त्राच्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गॉटिन्जट आणि पुणे विद्यापीठ अशा दोन्ही विद्यापीठांचे प्रमाणपत्र मिळणार आहे.
विद्यापीठाच्या आवारात येत्या काळात शिक्षणशास्त्र विभाग, शारीरिक शिक्षणशास्त्र विभाग यांची जागा ‘स्कूल ऑफ एज्युकेशन’ घेणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या योजनेनुसार विद्यापीठात स्कूल ऑफ एज्युकेशन सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. नुकत्याच झालेल्या विद्यापरिषदेच्या बैठकीत स्कूल ऑफ एज्युकेशन सुरू करण्याला मान्यता देण्यात आली असून तो प्रस्ताव व्यवस्थापन परिषदेकडे पाठवण्यात आला आहे.