News Flash

पहिल्या ‘सेल्फी डे’ला शिक्षकांचीच सुट्टी!

तुरळक शिक्षकांनी भीतीने काढलेले ‘सेल्फी’ संगणक प्रणालीच्या मर्यादेमुळे अपलोडच होऊ शकले नाहीत.

शिक्षण विभागाच्या फतव्याला कडाडून विरोध; संगणक प्रणालीनेही निर्णयाचा फज्जा

शाळांमधील अनियमित विद्यार्थी आणि शाळाबाह्य़ मुले शोधण्यासाठी वर्गशिक्षकांनी मुलांबरोबर ‘सेल्फी’ घेण्याच्या शिक्षण विभागाच्या अव्यवहार्य निर्णयाचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. नाताळच्या सुटीनंतर पहिल्या सोमवारी भरलेल्या शाळेत शिक्षकांनी या ‘सेल्फी’ सोपस्काराला सुट्टी देऊन शिकविणे पसंत केले, तर तुरळक शिक्षकांनी भीतीने काढलेले ‘सेल्फी’ संगणक प्रणालीच्या मर्यादेमुळे अपलोडच होऊ शकले नाहीत.

राज्यातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची पडताळणी करण्यासाठी आणि त्याआधारे शाळाबाह्य़ मुले शोधून काढण्यासाठी शिक्षकांनी दर सोमवारी मुलांबरोबर ‘सेल्फी’ काढून तो सरल या प्रणालीवर अपलोड करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. जानेवारी २०१७ च्या पहिल्या सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी सूचना शिक्षण विभागाने दिली होती. त्यानुसार सोमवारी (२ जानेवारी) शिक्षकांनी पहिला ‘सेल्फी’ घेणे अपेक्षित होते. दर सोमवारी होणाऱ्या या फोटोपरेडला शिक्षकांचा विरोध असला तरी काय होणार याबाबत शिक्षकांमध्येही उत्सुकता होती. हा पहिला सोमवार शिक्षकांनी ‘नो सेल्फी डे’ केला. संघटनांशी संबंधित असलेल्या शिक्षकांनी सोमवारी सेल्फी घेतले नाहीत. ‘उद्या शिक्षण विभागाला सेल्फी पाठवायचे नाहीत,’ असे संदेश रविवारपासूनच शिक्षकांमध्ये फिरू लागले. ‘निर्णय प्रसिद्ध झाला, पण अजून सूचना मिळाल्या नाहीत,’ अशी भूमिका घेऊन अनेक शिक्षकांनी ही छायाचित्र मोहीम टाळली. या सगळ्या चर्चामध्ये नसलेले अनेक शिक्षक तर ‘सेल्फी’चा मुद्दा विसरूनच गेले होते.

‘सेल्फी घेतला, पण..’

स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळांमधील काही शिक्षकांनी शाळेच्या सुरुवातीच्या वेळातील तासभर घालवून ‘सेल्फी’ घेतले. मात्र सरल प्रणालीवर ते अपलोड होऊ शकले नाहीत. ‘शिक्षण विभागाने तयार केलेले अ‍ॅप डाऊनलोड झाले नाही. हा निर्णय पुढे ढकलल्याबाबतही काही सूचना आली नाही. सकाळी शाळा भरल्यावर मुलांचे दहा दहाचे गट करून ‘सेल्फी’ घेतला. त्यासाठी किमान तासभर गेला,’ असे एका शिक्षकाने सांगितले.

तयारीच नाही..

शिक्षकांनी सेल्फी काढून ते अपलोड करण्यासाठीची यंत्रणा शिक्षण विभागाकडूनच अद्याप तयार झालेली नाही. ही प्रणालीची चाचणी घेण्याचे काम शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. राज्यातील तंत्रस्नेही शिक्षक त्यासाठी मदत करत असून पुढील आठवडय़ापर्यंत ही प्रणाली कार्यरत होऊ शकेल, असे शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2017 3:53 am

Web Title: teacher took leave on selfie day
Next Stories
1 ‘एमबीबीएस’ डॉक्टरांना आयुर्वेदातील  पदव्युत्तर पदवीला थेट प्रवेश
2 कॅपिटल बॉम्बस्फोटातील क्रांतिकारक हरिभाऊ लिमये यांचे निधन
3 शिवाजी रस्त्यावरील १८ पैकी ६ एटीएम केंद्रांमध्येच रोकड
Just Now!
X