नगरसेविका आणि तिच्या पतीविरूद्ध माऊंट कारमेल शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी सोमवारी शाळेबाहेर आंदोलन केले. शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी नगरसेविका आणि तिच्या पतीकडून धाक दाखवला जात असल्याचा आरोप शाळा व्यवस्थापनाने केला आहे.
लुल्लानगर भागातील माऊंट कारमेल शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी सोमवारी आंदोलन केले. शाळेत काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून द्यावा म्हणून नगरसेविका आरती बाबर आणि त्यांचे पती साईनाथ बाबर यांच्याकडून दबाव आणण्यात येत असल्याचा शाळेचा आरोप आहे. या नगरसेविकेविरूद्ध आंदोलन करण्यात आले. साईनाथ बाबर यांनी परवानगी न घेता काही पुरूषांना घेऊन मुलींच्या शाळेत प्रवेश केला. शाळेतील वस्तूंची मोडतोड केली, असे आरोप शाळेने केले आहेत.
दोन महिन्यांपासून बाबर यांचा शाळा व्यवस्थापनाला त्रास होत असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर मॅरिसा ए. सी. यांनी सांगितले. मॅरिसा यांनी दिलेल्या माहितीनुसार आरती बाबर यांनी शाळेत जाऊन काही विद्यार्थिनींना प्रवेश देण्याची मागणी केली. मात्र, शाळेत रिक्त जागा नसल्यामुळे या विद्यार्थिनींना प्रवेश देता येणार नाही असे शाळेकडून सांगण्यात आले. आरती बाबर शाळेतून बाहेर पडल्यानंतर त्यांचे पती साईनाथ बाबर काही लोकांना घेऊन शाळेच्या आवारात घुसले आणि त्यांनी शाळेतील काही वस्तूंची मोडतोड केली.
शाळेने केलेले आरोप साईनाथ बाबर यांनी फेटाळून लावले आहेत. शाळेची प्रवेश प्रक्रिया पारदर्शक नाही. या शाळेत १ लाख रुपये देणगी शुल्क घेऊन प्रवेश दिले जातात, असे आरोप बाबर यांनी शाळेवर केले आहेत. ‘माझी पत्नी नगरसेविका आहे. या शाळेबद्दल तिच्याकडे अनेक लोकांच्या तक्रारी आल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी जाऊन सोडतीच्या माध्यमातून (लॉटरी) प्रवेश देण्याची विनंती आम्ही केली होती. मात्र शाळेने ऐकले नाही,’ असे बाबर यांनी सांगितले.