विश्रांतवाडी येथील  पुणे इंटरनॅशनल स्कूलमधील एका शिक्षिकेने सहावीत शिकणाऱ्या आर्यन वाघमारे याचे भर वर्गात केस कापल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडला. या प्रकाराबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून शाळेच्या मुख्याध्यापिकेसह शिक्षिकेवर विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँग्रेस कार्यकर्ते असलेल्या हुलगेश चलवादी यांची विश्रांतवाडी येथे ही शाळा आहे. शाळेत सहावीत शिकणाऱ्या आर्यन वाघमारे या विद्यार्थ्यांने केस न कापल्याने श्वेता गुप्ता या शिक्षिकेने आधी एकदा त्याच्या केसांची वेणी बांधली होती. त्यानंतर कात्रीने पुढचे केस कापले. भर वर्गात अर्धवट केस कापण्यात आल्याने बाकी विद्यार्थ्यांनी आर्यनची चेष्टा केली. त्यामुळे घाबरलेल्या आर्यनने घरी जाऊन ‘माझे टक्कल करा, मला शाळेत जायचे नाही’ असा धोशा लावला. आर्यनची आई आदिती यांनी या प्रकाराबाबत मुख्याध्यापिका जयश्री कदम यांना जाब विचारला असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले होते.

‘भर वर्गात केस कापण्यात आल्याने पाल्य घाबरलेला आहे. त्याला शाळेत जाण्याची भीती वाटत आहे. मुख्याध्यापिकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले, की तीनचार मुलांचे केस कापले होते, पण तुम्हीच तक्रार करत आहात, असे उत्तर दिले. हा प्रकार गंभीर आहे. त्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होण्याबाबत पोलिसांकडे विचारणा केली असता पोलिसांकडून बालकल्याण आयोगाकडे तक्रार करण्यास सांगण्यात आले आणि बालकल्याण आयोग पोलिसांकडे तक्रार करा, असे म्हणतात,’ असे पालक आदिती वाघमारे यांनी सांगितले होते.

दरम्यान मुलांचे केस कापण्याबाबत शाळेकडून देण्यात आलेल्या सूचनांकडे पालकांनी दुर्लक्ष केले. मात्र, घडलेला प्रकार योग्य नाही. त्यामुळे त्याबाबत आलेल्या तक्रारीची तत्काळ दखल घेऊन संबंधित शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच सर्व शिक्षकांची बैठक घेऊन नियमांचे पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती संस्थाचालक हुलगेश चलवादी यांनी दिली.