पुणेस्थित ‘टेकएक्स्पर्ट इंजिनीअरिंग’ कं पनीचे तंत्रज्ञान

पुणे : दरवाजाच्या कडय़ा, दिव्यांची बटणे अशा वस्तूंना सतत स्पर्श होत असल्याने त्यापासून विषाणू संसर्ग होत असल्याचे करोना विषाणूमुळे स्पष्ट झाले आहे. मात्र, अशा वस्तूंवरील विषाणूंना के वळ वीस मिनिटांत नष्ट करणारे, किमान तीस वर्षे टिकणारे विषाणूरोधी आवरण पुण्यातील ‘टेकएक्स्पर्ट इंजिनीअरिंग’ या कं पनीने विकसित के ले असून, नॅनो सिल्व्हर तंत्राच्या साहाय्याने रसायनाचा थर वस्तूंना दिल्यास विषाणूंचा प्रसार रोखणे शक्य आहे.

‘टेकएक्स्पर्ट इंजिनीअरिंग’ या कं पनीचे संचालक जे. व्ही. इंगळे यांनी या तंत्रज्ञानाची माहिती ‘लोकसत्ता’ला दिली. नॅनो सिल्व्हर या घटकांना २० ते ३० नॅनो मॅट्रिक्सपर्यंत बारीक के ले जाते. विशिष्ट प्रक्रिया करून हे रसायन वस्तूंना लावले जाते. त्यानंतर त्या वस्तू १४० ते १८० डिग्री तापमानापर्यंत तापवल्या जातात. त्यानंतर या रसायनाचे आवरणात रूपांतर होते. या आवरणावर कोणताही विषाणू २० मिनिटांपेक्षा अधिक काळ टिकत नाही. त्यामुळे सतत स्पर्श होणाऱ्या वस्तूंना हे आवरण दिल्यास त्या विषाणूरोधी होतात. जर्मनीमधून या तंत्रज्ञानाची चाचणी करून ते सिद्ध करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानासाठी जीबी नौहौस या जर्मन कं पनीने सहकार्य के ले आहे. धातू, काच, प्लास्टिक अशा तीन प्रकारच्या वस्तूंना हे आवरण करता येऊ शकते. एकदा आवरण तयार झाल्यावर किमान पंचवीस ते तीस वर्षे त्याला काही धोका पोहोचत नाही. अगदी टोकदार वस्तूने खरवडले, तरी त्याला ओरखडे पडत नाही इतके  ते कठीण होते.

‘सतत स्पर्श होणाऱ्या वस्तू सुरक्षित असणे गरजेचे आहे. त्यासाठी हे आवरण उपयुक्त ठरते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे आवरण करण्यासाठीचा खर्च किफायतशीर आहे. वस्तूच्या आकारमानानुसार त्याचा खर्च ठरतो. एकदा हे आवरण तयार के ल्यावर त्याचा फायदे जास्त आहेत,’ असे इंगळे यांनी सांगितले.

सार्वजनिक ठिकाणच्या वस्तूंना आवरण असणे आवश्यक

माणसांचा सतत वावर असलेल्या सार्वजनिक ठिकाणच्या वस्तूंना हे आवरण असणे गरजेचे आहे. हॉटेल, रुग्णालये, बस स्थानके , रेल्वे स्टेशन, विमानतळ अशा ठिकाणांसह रेल्वे, बस, विमाने, उद्वाहक, मोटारीचा दरवाजा यांचा अंतर्गत भाग आवरणाने सुरक्षित झाल्यास विषाणू संसर्ग रोखणे शक्य होऊ शकते, असे इंगळे यांनी सांगितले.