राज्याच्या तंत्रशिक्षण महाविद्यालयांमधील भरती कंत्राटी शिक्षक आणि शासनाच्या वादात सध्या रखडली आहे. त्यामुळे अधिव्याख्याता पदासाठी परीक्षा आणि मुलाखती होऊनही अंतिम निकाल गेली दोन वर्षे रखडल्यामुळे उमेदवारांच्या पदरी निराशा आली आहे.
राज्यातील तंत्रशिक्षण महाविद्यालयांमध्ये (पॉलिटेक्निक) विविध विषयांच्या अधिव्याख्याता पदासाठी २०१२ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, इंग्रजी, गणित या विषयांसाठी जाहिरात आली होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या पदांसाठी परीक्षा आणि मुलाखतीही घेण्यात आल्या. २०१४ मध्ये मुलाखतीपर्यंतची प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र त्यानंतर तब्बल दोन वर्षे उमेदवारांना काहीच कळवण्यात आले नाही. नियमित शिक्षकांची भरती करण्यापूर्वी कंत्राटी शिक्षक घेण्यात आले होते.
कंत्राटी शिक्षकांनी नियमित करण्याबाबत न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे उमेदवारांची शिफारस करण्यात येऊ नये, अशा सूचना शासनाने आयोगाला दिल्या आहेत, त्यामुळे भरतीची सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही अद्याप अंतिम निकाल जाहीर झालेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.