खांब पाडण्याची महामेट्रोवर नामुष्की; ढिसाळ काम होत असल्याचा आरोप

पुणे : मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेसाठी नदीपात्रात उभारण्यात येत असलेल्या खांबामध्ये (पिलर) तांत्रिक दोष असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. त्यामुळे नुकताच उभारण्यात आलेला हा खांब गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आला. हा खांब नव्याने उभारावा लागणार असल्यामुळे महामेट्रोकडून ढिसाळ काम होत असल्याचे आरोपही करण्यात येत आहेत. दरम्यान, खांबाच्या पायाला (फाउंडेशन) कोणताही धोका नसून तांत्रिकदृष्टय़ा योग्य नसल्यामुळे तो पाडण्यात आल्याचा दावा महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गिकेचे काम महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) कडून सुरु झाले आहे. वनाज ते रामवाडीपैकी वनाज ते जिल्हा न्यायालयापर्यंतच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून मेट्रोच्या सुधारित सविस्तर प्रकल्प आराखडय़ानुसार (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट- डीपीआर) नदीपात्रातून ही मार्गिका जाणार आहे. नदीपात्रातून जाणारा हा मार्ग उन्नत (इलेव्हिटेड) स्वरुपाचा आहे. त्यानुसार नदीपात्रातील मेट्रो मार्गिकेसाठी खांब उभारणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. वनाज ते जिल्हा न्यायालय या दरम्यानच्या मार्गिकेवर ३०० खांबांची उभारणी होणार आहे. त्यापैकी ५९ खांब नदीपात्रात प्रस्तावित आहेत. त्यातील २१ खांबांच्या पायाभरणीचे (फाउंडेशन) काम पूर्ण झाले आहे. त्यातील चार खांबांची प्रत्यक्ष उभारणी झाली असून चार खांबांची कामे प्रगतिपथावर आहेत. प्रगतिपथावर असलेल्या एका खांबावर काँक्रिटीकरण करण्याची प्रक्रिया मेट्रोच्या अभियंत्यांकडून सुरु करण्यात आली होती. काँक्रिटीकरण केल्यानंतर खांबामध्ये तांत्रिक दोष राहिल्याचे अभियंत्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे गुरूवारी जेसीबीच्या साहाय्याने खांब जमीनदोस्त करण्याची नामुष्की महामेट्रोवर ओढावली.

महामेट्रोला अपेक्षित असलेले उच्च दर्जाचे काम न झाल्यामुळे आणि काही तांत्रिक चुका लक्षात आल्यामुळे नव्याने खांबाचे काम करण्यात येणार असल्याची माहिती वनाज ते रामवाडी या मार्गिकेचे प्रकल्प प्रमुख गौतम बिऱ्हाडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. खांबाची उभारणी करताना जमिनीएवढेच बांधकाम जमिनीखाली करण्यात आले आहे. जमिनीखालील कामाला कोणताही धोका नाही. काँक्रिटीकरण करताना शटरमधून लिकेज राहिल्यामुळे खांब पाडून पुन्हा नव्याने उभारण्याची प्रक्रिया महामेट्रोकडून सुरु करण्यात आली आहे. अपेक्षित दर्जाचे काम झाले नसल्यामुळे आणि वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत, असे बिऱ्हाडे यांनी स्पष्ट केले.

अशा कामाची अपेक्षा नाही

मेट्रोचा खांब जमीनदोस्त करावा लागणार असल्यामुळे खांब उभारणीचा खर्चही वाया गेला आहे. दरम्यान, या कामात ढिसाळपणा होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला आहे. मुठा नदीपात्रामध्ये खांब उभारण्याच्या कामात पहिल्यापासूनच ढिसाळपणा होत होता. काही दिवसांपूर्वी खांब उभारणीसाठी सिमेंटचे बांधकाम करण्यात आले. हे काम करताना लोखंडी सळ्या वाकल्या होत्या. त्या आधार देऊन सरळ कराव्या लागल्या होत्या. खांब तोडावा लागत आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारच्या कामाची अपेक्षा नाही, असे मनसचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी म्हटले आहे.