ऑनलाइन माध्यमातून यंदा मंडळांचे विविध उपक्रम

पुणे : शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गेल्या वर्षांपासून ऑनलाइन गणेशोत्सवाच्या माध्यमातून भाविकांना दर्शनासह सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ऑनलाइन दर्शन तसेच अन्य उपक्रमांसाठी झटणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांना तंत्रकुशलांची मोलाची साथ लाभत आहे.

पोलिसांनी उत्सव कालावधीत आयोजित केले जाणारे विविध धार्मिक तसेच कार्यक्रमांचे प्रसारण ऑनलाइन पद्धतीने करावे, असे आवाहन केले आहे. मात्र, त्यापूर्वीच मंडळांनी पुढाकार घेऊन उत्सव कालावधीत भाविकांना ‘श्रीं’चे ऑनलाइन दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दरवर्षी उत्सवात राज्यातून नव्हे तर देशभरातील भाविक शहरात येतात. उत्सवाच्या कालावधीत दर्शनासाठी झुंबड उडते. करोनामुळे यंदाही सार्वजनिक स्वरूपात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांसाठी नियमावली लागू करण्यात आली आहे. उत्सवाच्या कालावधीत भाविकांची गर्दी टाळण्यासाठी विविध उपक्रमांसाठी ऑनलाइन व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

मानाच्या मंडळांसह प्रमुख मंडळांनी ऑनलाइन दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, ‘करोनाच्या संसर्गामुळे मंडळांकडून गेल्या वर्षांपासून विविध धार्मिक कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने प्रसारित केले जात आहेत. मंडळांकडून वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच धार्मिक कार्यक्रमांच्या प्रसारणासाठी विविध समाजमाध्यमांचा वापर करण्यात येत आहे. मंडळाचे संकेतस्थळ आहे. उत्सवाच्या कालावधीत भाविकांना अभिषेक, पूजेच्या नोंदणीसाठी ऑनलाइन माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे.’

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळांकडून गेल्या वर्षी उत्सव कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रसारण तसेच ‘श्रीं’चे दर्शन भाविकांना घेण्याची संधी विनोद सातव आणि त्यांच्या चमूने उपलब्ध करून दिली आहे. मंडळाचे उपक्रम भाविकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातव तसेच त्यांच्या तंत्रकुशल चमूचे महत्त्वाचे योगदान आहे, असे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचे संजीव जावळे यांनी नमूद केले. श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे संकेतस्थळ असून संकेतस्थळाच्या माध्यमातून दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे पदाधिकारी प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टकडून आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांना ऑनलाइन माध्यम उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रकारचे तांत्रिक साहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. वर्षभर दर्शन तसेच पूजा, अभिषेक तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाविकांना सहभागाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. करोनाच्या संसर्गापूर्वी मंडळांनी ऑनलाइन माध्यमातून ‘श्रीं’चे दर्शन भाविकांना घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. ऑनलाइन माध्यम तसेच समाजमाध्यमाचा प्रभावीपणे वापर करण्यात आल्याने देशातून नव्हे तर अगदी परदेशातून भाविकांना वर्षभर धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्याची संधी उपलब्ध क रून देण्यात आली आहे.

– चिंतामणी वर्तक, संचालक, इंडियन मॅजिक आय