मद्यप्राशनाचे व्यसनात रूपांतर होऊन त्यासाठी मदत घ्यावी लागणाऱ्यांचा वयोगट दिवसेंदिवस कमी होत चालला असल्याचे निरीक्षण दारूपासून परावृत्त करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या स्थानिक संस्थांनी नोंदवले आहे. पूर्वी साधारणपणे ३० ते ३५ वर्षांपासून सुरू होणारा मद्यपी रुग्णांचा वयोगट आता २२ ते २३ वर्षांपर्यंत खाली उतरला असून वीस वर्षांच्या खालच्या मुलांमध्येही मद्यप्राशनाचे व्यसन बघायला मिळत आहे.
‘ओइसीडी’ (ऑर्गनायझेशन फॉर इकोनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट) या जागतिक संस्थेचा मद्यप्राशनासंबंधीचा अहवाल १२ मे रोजी समोर आला. या अहवालानुसार १९९२- २०१२ या कालावधीत भारतात माणशी होणाऱ्या दारूच्या सेवनात ५५ टक्क्य़ांची वाढ झाली असून ओइसीडीचे सदस्य असलेल्या देशांमध्ये रशियन फेडरेशन आणि इस्टोनियानंतर भारताचा तिसरा क्रमांक लागला आहे. संस्थेच्या सदस्य देशांतील सरासरी आकडेवारी पाहता प्रत्येक ३ मुलांपैकी २ मुलांनी साधारणपणे १५ वर्षांचे असताना दारूची चव घेतलेली असते, असेही हा अहवाल सांगतो. या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता’ने स्थानिक पातळीवरील संस्थांची निरीक्षणे जाणून घेतली.  
दारूला समाजात प्रतिष्ठा दिली जाऊ लागली आहे, तसेच दारू सहजगत्या उपलब्ध होते हे मद्यपी रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याण्याचे महत्त्वाचे सामाजिक कारण आहे, असे मत ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’च्या उपसंचालक मुक्ता पुणतांबेकर यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या,‘‘दारू सोडवण्यासाठी संस्थेत येणाऱ्यांचा वयोगट साधारणपणे तिशीच्या पुढचा असे. आता तो कमी झाला असून संस्थेतील एकूण रुग्णांच्या १० टक्के रुग्ण २० वर्षांच्या खालचे आहेत. अगदी १५ वर्षांपासूनची मुलेही संस्थेत येऊ लागली आहेत. अधूनमधून दारू पिणाऱ्या व्यक्तींना (सोशल ड्रिंकर) कालांतराने दारूचे व्यसन लागण्याची शक्यता असते, परंतु हा प्रवास हळूहळू होत जातो. पण जेव्हा एखादे ‘टीनएजर’ मूल दारूचे व्यसन असण्याच्या कारणास्तव संस्थेत येते तेव्हा त्याचा हा प्रवास वेगाने पूर्ण झालेला असतो हे लक्षात घ्यायला हवे. पूर्वी सोशल ड्रिंकिंग करणाऱ्या १३ टक्के लोकांना दारूचे व्यसन लागते असे दिसून येई, पण आता हे प्रमाण देखील वाढते आहे. जितक्या कमी वयात दारूची ओळख होते तेवढी व्यसन लागण्याची शक्यता वाढते. संस्थेत पुरुषांसाठीच्या उपचारांसाठी १५० खाटा असून साधारणपणे त्यासाठी साधारणत: २ महिन्यांची प्रतीक्षा यादी असते.’’  
‘‘मुक्तांगणमध्ये महिलांसाठी १५ खाटा आहेत, आणि त्या देखील बहुतांश वेळा भरलेल्या असतात. ही तक्रार असलेल्या महिलांच्या उपचारासाठी संस्थेकडे होणारी चौकशीही वाढली आहे,’’ असेही पुणतांबेकर म्हणाल्या.  
७ ते ८ टक्के नागरिकांना मद्यपाश आजार होण्याची शक्यता असते, असे सांगून ‘अल्कोहोलिक अॅनॉनिमस’ या संस्थेच्या ‘इंटर’ गटाचे व्यवस्थापक अनुप कुमार म्हणाले, ‘‘आमच्या गटाकडे नव्याने येणाऱ्यांची संख्या वाढली असून २३ वर्षांपासूनची तरुण मुलेही येऊ लागली आहेत. पूर्वी मद्यपीडित असलेले परंतु आता दारू न पिणारे लोक त्यांचे अनुभव या मुलांना सांगून त्यांना दारूपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात.’’