News Flash

गळती दुरुस्तीला मुहूर्त कधी?

धरणाच्या दुरुस्तीला मुहूर्त नेमका कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तीनदा निविदा काढूनही दोनच ठेकेदारांचा प्रतिसाद

बांधकामातील त्रुटींमुळे पाण्याची मोठय़ा प्रमाणावर गळती होत असल्याने संवेदनशील झालेल्या टेमघर धरणाची दुरुस्ती तातडीने होणे गरजेचे असताना अद्यापही या प्रक्रियेला हवी तशी गती मिळालेली नाही. दुरुस्तीच्या कामासाठी ९८ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, तीनदा निविदा काढूनही केवळ दोनच ठेकेदारांनी त्यास प्रतिसाद दिला आहे. या निविदा आता शासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे धरणाच्या दुरुस्तीला मुहूर्त नेमका कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या खडकवासला धरणसाखळीतील टेमघर धरण ऑगस्ट महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरले होते. त्या वेळी धरणातून मोठय़ा प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आले. रोज लाखो लिटर पाणी धरणातून वाया जात असल्याबाबत बोंबाबोंब झाल्यानंतर अखेर शासनाला जाग आली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी तातडीने धरणाला भेट देऊन अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. त्यानंतर लगोलग धरणाच्या दुरुस्तीसाठी ९८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या प्रकरणातच जलसंपदा विभागाच्या दहा अभियंत्यांचे निलंबन, तर बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले.

धरणाची सद्यस्थिती पाहता दुरुस्ती तातडीने होणे गरजेचे आहे. दुरुस्तीसाठी हे धरण दीड महिन्यापूर्वी पन्नास टक्के रिकामेही करण्यात आले आहे. या कामासाठी शासनाकडून तीन वेळा निविदा काढण्यात आल्या. त्याला ठेकेदारांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात काढण्यात आलेल्या निविदांना केवळ दोन ठेकेदारांनी प्रतिसाद दिला. धरणाच्या दुरुस्तीसाठी नेमण्यात आलेल्या समितीसमोर या निविदांवर चर्चा झाली. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी या निविदा शासनाकडे पाठविण्यात आल्या आहेत. मंजुरी आल्यानंतर दोन ठेकेदारांपैकी कुणाला काम द्यायचे हे ठरणार आहे. त्यामुळे अद्यापही या दुरुस्तीच्या कामाला अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे. तांत्रिक अहवालानुसार धरणाची दुरुस्ती करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. दुरुस्ती सुरू होण्यास वेळ लागत असल्याने नियोजित कालावधीत काम पूर्ण होईल की नाही, हा प्रश्न आहे. सध्या पालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये नेते मंडळी व्यस्त आहेत. त्यामुळे मंजुरीबाबत साशंकता व्यक्त होत आहे. दरम्यान, दुरुस्तीच्या कामात तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शासन मान्यतेनंतर तातडीने ‘वर्क ऑर्डर’ काढली जाईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

टेमघरसाठी सोळावं वरीस धोक्याचं!

मुठा नदीवर पिरंगुट घाटाच्या अलीकडे असलेल्या टेमघर धरणाचे वय अवघे सोळा वर्षांचे आहे. मोठय़ा प्रमाणावरील गळतीमुळे हे सोळावं वरीस धरणासाठी धोक्याचं ठरते आहे. बांधकामातील अनेक तांत्रिक त्रुटी असल्याचे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे. ३.७५ टीएमसी (अब्ज घनफूट) इतक्या पाणीसाठय़ाची क्षमता असलेल्या धरणाचे बांधकाम १९९७ मध्ये सुरू करण्यात आले होते. २००१ मध्ये जवळपास सर्व काम पूर्ण झाले. मात्र, वनखात्याच्या आक्षेपांमुळे आठ वर्षे काम रखडले. त्यानंतर २०१० मध्ये त्यात पाणीसाठा झाला. पाणीसाठा झाल्यापासूनच धरणाची गळती चर्चेत आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 3:04 am

Web Title: temghar dam issue 3
Next Stories
1 ‘पुण्याच्या वारसा स्थळांसाठी वेगळी संस्था हवी’
2 बाजारभेट : फुलांच्या बाजारपेठेचा व्यावहारिक गंध!
3 परदेशी पाहुण्यांना ‘परिषदा दर्शन’
Just Now!
X