दोन वर्षांनंतर टेमघर धरण १०० टक्के भरले

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार प्रमुख धरणांपैकी एक असलेले टेमघर धरण दोन वर्षांनंतर सोमवारी रात्री १०० टक्के भरले. त्यामुळे यंदा पुणेकरांना हक्काचे ३.७० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी मिळणार आहे. या धरणाची गळती रोखण्याचे काम फेब्रुवारी २०१७ मध्ये हाती घेण्यात आले होते. आतापर्यंत ९० टक्के गळती रोखण्यात जलसंपदा विभागाला यश आले आहे. तर, धरणाचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी येत्या डिसेंबरअखेर हे धरण रिकामे करण्यात येणार आहे.

दोन वर्षांपासून गळती आणि दुरुस्तीच्या कामामुळे या धरणात पाणी साठवण्यात येत नव्हते. धरणाची गळती रोखण्यासाठी गठित केलेल्या रानडे समितीने दिलेल्या निर्देशांनुसार धरणातील पोकळ्या भरून काढण्यासाठी सिमेंट, फ्लाय अ‍ॅश, सिलिका यांचे मिश्रण दाबाने धरणाच्या भिंतीत सोडण्यात आले. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात धरणातील पोकळ्या भरल्या असून धरणाचे मजबुतीकरण झाले आहे.

या कामाबाबत तज्ज्ञ समिती, जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राच्या (सेंट्रल वॉटर अ‍ॅण्ड पॉवर रीसर्च सेंटर – सीडब्लू अ‍ॅण्ड पीआरएस) तज्ज्ञांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच दुरुस्तीचे काम सीडब्लू अ‍ॅण्ड पीआरएस या संस्थेने केलेल्या शिफारसीनुसार तसेच शासनाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ गटाच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. गळती रोखण्यासाठी मे २०१९ अखेपर्यंत ६७ कोटी २१ लाख रुपये खर्च आला असून, त्यासाठी १०० कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र, सद्य:स्थिती पाहता एकूण खर्च १५० कोटींवर जाणार आहे. सध्या हे धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने या धरणातून सायंकाळी सहा वाजल्यापासून दोन हजार ३३३ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी मंगळवारी दिली.

धरण रिकामे करण्याची प्रक्रिया डिसेंबरमध्ये

टेमघर धरण १०० टक्के भरले आहे. शहराला लागणारे पाणी पावसाळ्यानंतर वरसगाव आणि पानशेत धरणांमधून न घेता सुरुवातीला टेमघरमधून खडकवासला धरणाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. हे धरण रिकामे झाल्यानंतर पुढील पावसाळ्यापर्यंत धरणाच्या दुरुस्तीचे उर्वरित काम करण्यात येईल. सीडब्लू अ‍ॅण्ड पीआरएस या संस्थेने यंदा धरणात १०० टक्के पाणी साठवण्यास हरकत नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

सन २०१६-१७ मधील गळतीच्या तुलनेत सध्या गळतीचे प्रमाण लक्षणीय रीत्या कमी असून धरण दुरुस्तीच्या कामाला यश आले आहे. सध्याचे गळतीचे प्रमाण २५० लिटर प्रति सेकंद एवढे आहे. सध्या होणारी गळती धरणाच्या सज्जात होत आहे. धरणाच्या निम्न बाजूची गळती आटोक्यात आली असून चालू वर्षीच धरण रिकामे केल्यानंतर शॉर्टक्रीटचे काम पूर्ण झाल्यानंतर सज्जामधून होणारी गळती देखील आटोक्यात येणार आहे.

– प्रवीण कोल्हे, अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळ