कमी कालावधीत गळती प्रतिबंधक कामे

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी एक असलेल्या टेमघर धरण दुरुस्तीच्या कामासाठी अर्थसंकल्पात २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून कमी कालावधीतील गळती प्रतिबंधक कामे पूर्ण करण्यात येणार आहेत, तर दीर्घ कालावधीच्या कामांचे नियोजन करण्यात येणार आहे.

पुणे शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी आणि एक हजार हेक्टर क्षेत्रफळ सिंचनाखाली आणण्यासाठी मुळशी तालुक्यातील लव्हार्डे येथे टेमघर धरण बांधण्यात आले आहे. या धरणाचे काम २००० मध्ये सुरू होऊन २०१०-११ पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा याठिकाणी करण्यात येत होता. सन २०१७ मध्ये धरणातून पाणीगळती होत असल्याचे निदर्शनास आले. तेव्हापासून या धरणाच्या मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. या धरणाची क्षमता ३.७१ अब्ज घनफू ट (टीएमसी) आहे. धरण बांधणीसाठी २५२ कोटी रुपये खर्च आला होता. गळती रोखण्यासाठी के ंद्रीय जल व ऊर्जा संशोधन संस्थेच्या (सीडब्ल्यू अ‍ॅण्ड पीआरएस) तज्ज्ञ समितीकडून कामाची पाहणी करण्यात येत आहे. धरणाची गळती ९० टक्के  रोखल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून करण्यात येत असला, तरी दीर्घकालीन कामे करणे आवश्यक आहे.

दरम्यान, धरणाच्या वरील बाजूची कामे झाली असून खालच्या बाजूची कामे बाकी आहेत. त्याकरिता २५ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता होती. त्यानुसार अर्थसंकल्पात दुरुस्तीच्या कामांसाठी २५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून कमी कालावधीतील गळती प्रतिबंधक कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. तसेच सीडब्ल्यू अ‍ॅण्ड पीआरएस या संस्थेला काही निधी देऊन दीर्घ कालावधीची कामे, धरण मजबुतीकरण यांबाबत विविध चाचण्या व छाननी करणे ही कामे करण्यात येणार आहेत, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.

धरणाच्या खालच्या बाजूचे काम बाकी

या धरणाच्या दुरुस्तीचे काम २०१७ पासून सुरू आहे. करोना काळात दुरुस्तीची कामे थांबवण्यात आली होती. उर्वरित दीर्घ कालावधीची कामे करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठका झाल्या आहेत. कमी कालावधीच्या धरण दुरुस्तीची कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी हे धरण रिकामे करण्यात येत असून या धरणात सध्या ०.५० अब्ज घनफू ट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे.