जलसंपदामंत्र्यांची ग्वाही; धरणाच्या दुरुस्तीचा आढावा

टेमघर धरणाची गळती ९० टक्के कमी झाली असून हे धरण सुरक्षित असल्याची ग्वाही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राज्यातील इतर धरणांमधील गळती रोखण्यासाठी ‘टेमघर पॅटर्न’ अमलात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

जलसंपदामंत्री महाजन यांनी टेमघर धरणाच्या दुरुस्तीचा आढावा घेतला. सन २०१६ मध्ये टेमघर धरणातून मोठय़ा प्रमाणावर पाण्याची गळती होत होती. त्याची गंभीर दखल घेत, तातडीने धरणाच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे निर्देश महाजन यांनी दिले होते. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून गेल्या दोन वर्षांपासून गळती थांबण्याची कामे हाती घेण्यात आली होती. या कामांची पाहणी महाजन यांनी केली.

टेमघर धरणाची गळती २०१६ च्या तुलनेत ९० टक्के कमी झाली असून आता धरण सुरक्षित झाले असल्याचे महाजन यांनी या वेळी सांगितले. पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे या वेळी उपस्थित होते.

राज्यातील सर्वाधिक गळती असणारे धरण अशी ओळख असलेल्या टेमघर धरणाची गळती रोखण्यासाठी ग्राउटिंग आणि शॉर्टक्रीट तंत्रज्ञानाचा वापर करून ही कामे पूर्ण केली जात आहेत. जलसंपदा विभागाच्या या प्रयत्नांना यश आले असून राज्यातील इतर धरणांमधील गळती रोखण्यासाठी टेमघर धरणाच्या धर्तीवर कामे करण्यात येणार आहेत, असेही महाजन यांनी सांगितले.

टेमघर धरण यंदा १०० टक्के भरले होते. येत्या डिसेंबपर्यंत हे धरण रिकामे करून उर्वरित गळती रोखण्याची कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या नियोजनानुसार कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश महाजन यांनी या वेळी दिले.