उन्हामुळे अंगाची काहिली; तर काही भागांत अवकाळी पाऊस

कोरडे हवामान आणि नीरभ्र आकाशामुळे राज्यात सर्वच ठिकाणी उन्हाचे चटके वाढले असून, अनेक ठिकाणी कमाल तापमान चाळिशीपार गेल्याने नागरिकांच्या अंगाची काहिली होत आहे. मुंबई आणि पुण्यासह राज्यातील सर्वच महत्त्वाच्या शहरांमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे.

किमान तापमानातही सर्वच ठिकाणी वाढ झाल्याने रात्री उकाडा जाणवतो आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तापमानात झपाटय़ाने वाढ होत आहे. कोरडय़ा हवामानामुळे किमान तापमानात आणखी वाढ होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात मार्च महिन्याच्या पंधरवडय़ानंतर कमाल तापमानात वाढ सुरू झाली.  रविवारच्या (२४ मार्च) तुलनेत राज्यात सोमवारी (२५ मार्च) एकाच दिवसात कमाल आणि किमान तापमानात मोठय़ा प्रमाणावर वाढ नोंदविली गेली. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ासह कोकण विभागातही आता उन्हाच्या झळा आणि उकाडय़ात वाढ झाली आहे.

पुणे, जळगाव, मालेगाव आणि सोलापूरमधील पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. नाशिक, सांगली, सातारा आदी ठिकाणी ३९ अंशांपुढे तापमान असल्याने उन्हाच्या झळा जाणवत आहेत. मराठवाडय़ात परभणी येथे ४१.४ अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भातील अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ४१.६ अंश तापमानाची नोंद झाली.

कोल्हापूर, सांगलीत गारांसह सरी

अचानक वाढलेल्या उकाडय़ाने हैराण झालेल्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्य़ात सोमवारी सायंकाळी गारांसह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. सातारा जिल्ह्य़ातील कराड परिसरातही पावसाच्या काही सरी कोसळल्या. सांगली जिल्ह्य़ातदेखील दिवसभराच्या सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. गेले चार दिवस दिवसाच्या कमाल तपमानात वाढ होत असून सोमवारी दुपारी तापमान ३८ अंशापर्यंत पोचले होते. मात्र ढगाळ हवामान आणि हवेतील आद्र्रता यामुळे तापमान याहून जास्त असल्यासारखे जाणवत होते. या पावसाने वाळवणीवर टाकलेल्या बेदाण्यावर परिणाम होण्याची भीती आहे.