विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात गारठा वाढला

उत्तरेकडील काही राज्यांमध्ये पुन्हा थंडीची लाट आल्याने त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. राज्यात सर्वच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ातील गारठय़ात वाढ झाली आहे. कोरडय़ा हवामानामुळे तापमान काही दिवस कायम राहणार असून विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राज्यात डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये हुडहुडी भरविणारी थंडी पडली होती. नव्या वर्षांचे स्वागतही कडाक्याच्या थंडीने झाले. कोकण आणि मुंबई विभाग वगळता इतर सर्वत्र किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली आले होते. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात मात्र किमान तापमानासह कमाल तापमानातही काही प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे बहुतांश भागात किमान तापमान १० अंशांपुढे गेल्याने थंडीचा कडाका कमी झाला होता. मात्र, थंडीत पुन्हा वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. सध्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आहे. तेथून येणारे थंड वाऱ्यांचे प्रवाह आणि कोरडे हवामान राज्यातील थंडीला पोषक ठरते आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा पुन्हा १० अंशांखाली आला आहे.

मुंबईत १७.५ अंश, तर सांताक्रुझमध्ये १३.४ अंश तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीच्या तुलनेत अनुक्रमे २ आणि ३.४ अंशांनी कमी आहे. त्यामुळे या भागात काहीसा गारवा जाणवतो आहे. मध्य महाराष्ट्रात पुण्यातील तापमानाचा पारा ८ अंशांवर असल्याने रात्री चांगलाच गारवा जाणवतो. नाशिकचा पारा ६.९ अंशांवर असून, तेथे थंडीचा कडाका वाढला आहे. जळगावला बुधवारी राज्यातील नीचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

मालेगाव, साताऱ्यामध्ये किमान तापमान १० अंशांखाली आहे. मराठवाडय़ात औरंगाबाद, परभणी, बीडमध्ये ८ ते ९ अंशांवर किमान तापमान आहे.  विदर्भातही बहुतांश ठिकाणी किमान तापमान ८ ते ९ अंशांवर आहे. नागपूर, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया आदी भागात चांगलाच गारठा आहे. या भागातील थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे.