मध्य महाराष्ट्र, विदर्भातील किमान तापमानात घट

उत्तर भारतातून राज्याच्या दिशेने पुन्हा अतिथंड वाऱ्यांचे प्रवाह सुरू झाल्याने राज्याच्या बहुतांश भागातील गारठय़ात वाढ झाली आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामधील किमान तापमानात लक्षणीय घट नोंदविण्यात आली आहे. थंडीची ही स्थिती पुढील तीन ते चार दिवस कायम राहणार असून, तापमानात चढ-उतार होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह सुरू असताना बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे वाहात असल्याने गेले काही दिवस किमान तापमानात वाढ होऊन थंडी काहीशी गायब झाल्याचे चित्र होते. मात्र, सध्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहांची तीव्रता वाढली आहे. पश्चिमी चक्रवातामुळे हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यांमध्ये हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. पंजाब, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश आदी परिसरामध्ये किमान तापमानात ४ ते ५ अंशांची घट होऊन थंडीच्या लाटेची शक्यता आहे. उत्तर भारतामध्ये बहुतांश ठिकाणी थंडी आहे. या सर्व स्थितीचा परिणाम राज्याच्या हवामानावर होत आहे. सध्या थंड वाऱ्यांचे प्रवाह येत असल्याने गारठय़ात वाढ होत आहे. पुढील काही दिवस राज्यातील आकाशाची स्थिती निरभ्र राहणार असल्याने तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.

पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे गेल्या तीन ते चार दिवसांत राज्यात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. उत्तरेकडून येणारे थंड आणि पूर्वेकडील उष्ण, बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे विदर्भात २४ जानेवारीपासून हलक्या पावसाने हजेरी लावली. तुरळक ठिकाणी गारपीटही झाली. या पावसामुळे उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भातील किमान तापामानात घट झाली असून, ते सरासरीच्या खाली गेल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. सोमवारी बुलढाणा येथे राज्यातील नीचांकी ८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)

मध्य महाराष्ट्रातील पुणे १०.९, नगर ९.९, जळगाव ९.४, कोल्हापूर १७.७, महाबळेश्वर ९.६, नाशिक ९.४, मालेगाव ९.२, सांगली १५.४, सातारा १५.२, सोलापूर १५.१, कोकण विभागातील मुंबई (कुलाबा) १९.८, सांताक्रुझ १८.२, अलिबाग १७.९, रत्नागिरी २०.४, मराठवाडय़ातील औरंगाबाद १०.०, परभणी १२.५, नांदेड १३.०, बीड १२.०, विदर्भातील अकोला ११.०, अमरावती १०.४, ब्रम्हपुरी १०.३, चंद्रपूर १३.०, गोंदिया आणि नागपूर १०.८, वाशिम ९.४, यवतमाळ १०.४.