तापमानात चढ-उतार होण्याचा अंदाज

पुणे : पुणे शहर आणि परिसरातील कमाल तापमानाचा पारा मागील तीन दिवसांपासून ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे असल्याने शहरात उकाडा जाणवत आहे. पुढील आठवडाभर तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. कमाल तापमानात किंचित घट, तर किमान तापमानात वाढ होणार असल्याने रात्रीचा उकाडा वाढणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात पुढील दोन ते तीन दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याबरोबरच हवामान विभागाकडून विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

राज्यासह शहरामध्ये मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ापासून दिवसाच्या तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. गेल्या आठवडय़ामध्ये शहरात कमाल तापमानाचा पारा ३४ ते ३६ अंशांवर स्थिर होता. त्यानंतर १६ मार्चला तापमानात एकदम वाढ होत कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे पोहोचले. त्यामुळे उन्हाचा चटका वाढला आहे. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून तापमान ३७ अंशांच्या आसपास स्थिर आहे.

सकाळी नऊ-दहापासूनच उन्हाचा चटका जाणवतो आहे. दुपारी उन्हाच्या झळा तीव्र होत असल्याने अनेकजण घराबाहेर पडणे टाळत आहेत. घर, कार्यालयांमध्ये पंखे किंवा वातानुकूलित यंत्रणेचा वापर वाढला आहे. कमाल तापमानाचा पारा या आठवडय़ामध्ये काहीसा कमी होणार आहे. मात्र, रात्रीच्या तापमानात वाढ होणार असल्याने रात्री उकाडा वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी शहरात ३७.४ अंश कमाल, तर १४.५ अंश किमान तापमानाची नोंद झाली.

राज्यात उन्हाचा चटका कायम

राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. सोमवारी नगर येथे राज्यातील उच्चांकी ४०.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर आणि नाशिक वगळता बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३६ ते ३९ अंशांवर आहे. कोकण विभागातील मुंबईत ३१.५, तर सांताक्रुझ येथे ३४ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. सरासरीपेक्षा हे तापमान अधिक आहे. मराठवाडय़ात औरंगाबाद येथे ३६.६ अंश कमाल तापमान नोंदविले गेले. विदर्भात अमरावती, चंद्रपूर, वर्धा येथे ३८ अंश, अकोला, ब्रह्मपुरी, वाशिम आदी भागात कमाल तापमान ३७ अंशांपुढे नोंदविले जात आहे.