पुणे : आकाशाची ढगाळ स्थिती असतानाच पुणे शहर आणि परिसरामधील तापमानात मोठय़ा प्रमाणावर वाढ होत आहे. दिवसा निरभ्र आकाश असल्याने बुधवारी हंगामातील उच्चांकी ४०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. संध्याकाळनंतर ढगाळ स्थिती झाल्याने उकाडय़ात प्रचंड वाढ झाली. पुढील दोन ते तीन दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

शहरात गेल्या आठवडय़ामध्ये पावसाळी स्थिती होती. त्याचा परिणाम म्हणून तापमानात काही प्रमाणात घट झाली होती. दोन दिवसांपासून निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानाची स्थिती असल्याने तापमानात झपाटय़ाने वाढ होत आहे. मंगळवारी शहरातील कमाल तापमानाचा पारा पुन्हा चाळिशीच्या पार गेला. बुधवारी आणखी वाढ होऊन पारा ४०.४ अंशांपर्यंत पोहोचला. हे तापमान सरासरीच्या तुलनेत २.७ अंश सेल्सिअसने अधिक आहे. रात्रीच्या तापमानातही वाढ झाली असून, बुधवारी २४.३ अंशांवर किमान तापमान पोहोचले असून, ते सरासरीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे रात्रीच्या उकाडय़ात वाढ झाली आहे. शहर आणि परिसरामध्ये पुढील दोन दिवस कधी निरभ्र आकाश, तर कधी ढगाळ स्थिती राहणार आहे. परिणामी दिवसाच्या कमाल तापमानामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दोन दिवस दिवसाचे तापमान ४२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. रात्रीचे तापमान २३ ते २४ अंशांच्या आसपास राहील. त्यामुळे उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. ९ मेपासून शहरात दुपारनंतर आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.