कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे राज्य उन्हाच्या चटक्यांनी पुन्हा तापू लागले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मंगळवारी ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४५.१ अंश कमाल तापमानाची नोंद झाली.

राज्यात १२ एप्रिलनंतर पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. सुमारे आठवडाभर राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीटही झाली. त्यानंतर तापमानाचा पारा काहीसा खाली आला होता. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये दिवसाच्या तापमानाबरोबरच रात्रीच्या तापमानातही वाढ होऊ लागली. त्यामुळे दिवसा उन्हाचे चटके आणि रात्रीच्या उकाडय़ात वाढ झाली. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी बहुतांश ठिकाणी तापमानाच्या पाऱ्यात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ दिसून आली.

सध्या राजस्थानमध्ये उष्णतेची लाट आहे. विदर्भामध्ये २५ ते २७ एप्रिलला काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भामध्ये मंगळवारी सर्वच ठिकाणी तापमानाचा पारा ४१ ते ४५ अंशांदरम्यान होता. ब्रह्मपुरीसह अकोला, चंद्रपूर, वर्धा आदी ठिकाणी उन्हाचा चटका अधिक होता. मराठवाडय़ात परभणी येथे ४३.२ अंश तापमानाची नोंद झाली. इतर सर्वच ठिकाणी तापमान ४० अंशांपुढे नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रात पुणे, जळगाव, मालेगाव, नाशिक, सातारा, सोलापूर आदी ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा अधिक ४० अंशांपुढे गेले आहे. कोकण विभागातील मुंबईत ३३.२, सांताक्रूझ येथे ३४.८ अंश तापमान नोंदविले गेले, तर रत्नागिरीत ३४.६ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. सर्वच ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा अधिक असल्याने उष्मा वाढला आहे.