कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात गेल्या आठवडय़ात निर्माण झालेली पावसाळी स्थिती आता निवळणार आहे. विदर्भातील तुरळक विभाग वगळता राज्यात सर्वत्र एप्रिलच्या सुरुवातीपासून कोरडे हवामान होणार आहे. परिणामी दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने एप्रिल ते जून या कालावधीसाठी दिलेल्या दीर्घ अंदाजानुसार या तीन महिन्यांत राज्यातील तापमान सरासरीच्या तुलनेत किंचित अधिकच राहील.

चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्याच्या बहुतांश भागामध्ये आठवडय़ापासून पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. मध्य  महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात या दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारपीटही झाली. करोना विषाणूच्या संसर्गाची पाश्र्वभूमी असताना पावसामुळे नागरिकांच्या चिंतेत भरच पडली. मात्र, पावसाळी स्थिती पुढील दोन दिवसांत निवळण्याची शक्यता आहे.

दिवसा उन्हाचा चटका, रात्री उकाडा

राज्यात अनेक ठिकाणी सध्या रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या पुढे गेल्याने रात्रीच्या उकाडय़ात उल्लेखनीय वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे दिवसाच्या कमाल तापमानातही वाढ नोंदविण्यात येत आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमान सध्या २० ते २४ अंशांच्या दरम्यान आहे. कोकण विभागात मुंबईसह सर्वच ठिकाणी किमान तापमानाचा पारा २३ ते २४ अंशांवर आहे. मराठवाडय़ातही २१ ते २२ दरम्यान किमान तापमानाचा पारा आहे. त्यामुळे या भागात रात्रीचा उकाडा आहे.