उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे राज्याच्या बहुतांश भागात सध्या रात्रीचा गारवा वाढतो आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ातील रात्रीच्या किमान तापमानात घट होऊन ते सरासरीच्या आसपास आले आहे. आठवडाभर कोरडे हवामान राहणार असल्याने थंडीचा कडका वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

सध्या उत्तर भारतातून राज्याकडे थंड वारे वाहत आहेत. थंडीसाठी पोषक कोरडे हवामान निर्माण झाले आहे. त्यामुळे संध्याकाळनंतर गारवा जाणवतो. मुंबई, रत्नागिरी, अलिबाग आदी विभाग वगळता इतरत्र किमान तापमानात मोठय़ा प्रमाणावर घट होत आहे. बहुतांश भागातील रात्रीचे किमान तापमान १४ ते १७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. कमाल तापमान सरासरीच्या आसपास आल्याने उन्हाचा चटका कमी झाला आहे.

रविवारी राज्यातील सर्वात कमी तापमान महाबळेश्वर येथे १४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रातील पुण्यात १५ अंश, नाशिक येथे १५.५ अंश तापमानाची नोंद झाली. नगर, सांगली, सातारा, सोलापूर येथेही किमान तापमानात घट झाली आहे. मुंबईतील किमान तापमान २४ अंशांवर असून, सरासरीच्या तुलनेत ते १.७ अंशांनी अधिक आहे. मराठवाडय़ात औरंगाबाद आणि परभणी येथे अनुक्रमे १४.९ आणि १४.० अंश किमान तापमानाची नोंद झाली.

विदर्भात सर्वाधिक थंडी

विदर्भात अनेक ठिकाणी तापमान १४ ते १६ अंशांपर्यंत खाली आल्याने तेथे थंडीचा कडाका वाढला आहे. नागपूर येथील किमान तापमान १४.४ अंशांपर्यंत खाली आले आहे. यवतवाळ येथील किमान तापमान सरासरीपेक्षा १.७ अंशांनी खाली येऊन १५ अंशांवर पोहोचले आहे. अकोला, अमरावती, गोंदिया, बुलडाणा, वध्र्यातही किमान तापमानही सरासरीच्या खाली आहे.

मुंबईतील किमान तापमान : मुंबईतील किमान तापमान २४ अंशांवर असून, सरासरीच्या तुलनेत ते १.७ अंशांनी अधिक आहे. मराठवाडय़ात औरंगाबाद आणि परभणी येथे अनुक्रमे १४.९ आणि १४.० अंश किमान तापमानाची नोंद झाली. नांदेड आणि बीड येथील किमान तापमानातही घट झाली आहे.