‘तृप्ती देसाई व इतर काही महिलांनी मंदिर प्रवेशासाठी मार खाल्ला. ती नुसती स्टंटबाजी नाही. स्टंटबाजी मुख्यमंत्र्यांनी केली. जिल्हाधिकारी आणि ग्रामीण पोलीस अधीक्षकांना याबाबतच्या कायद्याच्या अंमलबजावणीचे आदेश देण्यास सरकार बांधील आहे. महिलांना मंदिर प्रवेश करण्यापासून रोखणाऱ्यांना सहा महिन्यांचा कारावास आणि दंड आकारण्याची शिक्षाही कायद्यात आहे. यातील एकही गोष्ट सरकारने व मुख्यमंत्र्यांनी केली नाही,’ असे मत ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्यां विद्या बाळ यांनी व्यक्त केले.
‘बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाऊंडेशन’तर्फे तरुण अभिनेते ओंकार गोवर्धन यांना बलराज साहनी पुरस्कार व प्रसिद्ध लेखक संजय पवार यांना कैफी आझमी पुरस्कार बाळ यांच्या हस्ते रविवारी प्रदान करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. प्रसिद्ध नाटककार धर्मकीर्ती सुमंत, संयोजक सुरेश टिळेकर, सोमेश्वर गणाचार्य, शिवानी हरिश्चंद्रे या वेळी उपस्थित होते. अलका देशपांडे, अनिकेत बाळ यांचा या वेळी विद्या बाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
विद्या बाळ म्हणाल्या,‘मी देव मानत नाही, परंतु तो मानणाऱ्यांना उपासनेचा अधिकार आहे. त्यासाठी लढा आवश्यक होता. आजवर आपल्याला दारे का बंद होती हा प्रश्न स्त्रियांच्या मनात कधी येणार? आज दारे उघडली ती का, असा प्रश्न पडणार का? पाळी येणे हे अपवित्र ठरवून टाकले आहे. परंतु तिला पाळी आहे म्हणून तुम्ही-आम्ही आहोत. देवेंद्र फडणवीस यांना हे सांगण्याची गरज आहे, की मंदिर प्रवेशाबाबतचा कायदा आहेच. तुम्हाला वेगळे काही करायचे नाही. केवळ अंमलबजावणी करायची आहे.’
आपल्याला योग्य वाटणारी राजकीय, सामाजिक भूमिका घेणे गैर नाही, असे सांगून मंदिर प्रवेश तसेच देशातील स्थितीबाबत पवार म्हणाले, ‘आम्ही समाज म्हणून पुढे सरकलो की नाही असे वाटून उबग येतो. एका राजकीय पक्षाची सत्ता केंद्र व राज्यात आल्याने आभाळ कोसळेल असे मला वाटत नाही. कलाकारांसाठी प्रत्येकच काळ आव्हानात्मक असतो. आव्हानांची मांडणी करण्यात तसेच ती पुढे नेण्यासाठी माणसे तयार करण्यात आपण सर्व कमी पडतो. आता क्रियाशील व्हायची गरज आहे.’
‘लोक मूलभूत प्रश्नांकडे न जाता वरवरचे काम करतात व त्यांचे च्यानलीय कौतुक होते. मूळ प्रश्नांचा अभ्यास करून ते सोडवण्याची गरज आहे, असे सांगून पवार यांनी ‘नाम फाऊंडेशन’च्या कार्यपद्धतीवर टीका केली.