चाचण्या यशस्वी; तंत्रज्ञान लवकरच प्रत्यक्षात

बर्फाने वेढलेल्या उंच पर्वतराजीवर कार्यरत असलेल्या जवानांना दळणवळण करणे सोपे व्हावे, या उद्देशातून तात्पुरत्या पूल उभारणीचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) दिघी येथील ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट’ने (आर. अँड डी. ई.) ‘माऊंटन फूट ब्रिज’ विकसित केला आहे. या पुलाच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून हे तंत्रज्ञान लवकरच प्रत्यक्ष वापरामध्ये येणार आहे.

युद्धकाळात सन्याची हालचाल गतीने होणे गरजेचे असते. मात्र, उंच पर्वतांमध्ये असलेल्या दऱ्या, नदी, बर्फ यांचा यामध्ये अडथळा ठरतो. त्यावर मात करण्यासाठी हा पूल पर्याय ठरू शकतो. या पुलाद्वारे ३५ मीटर अंतराची दरी दूर होऊ शकते. बर्फावरही उभारता येऊ शकतो असा हा पूल, नव्याने झालेली बर्फवृष्टीही सहन करू शकतो.

आर. अँड डी. ई. चे तांत्रिक अधिकारी एल. एन. भोसले म्हणाले,की ३५ मीटर लांबीच्या या पुलामध्ये २४ पॅनेल आहेत. पुलाच्या प्रत्येक भागाचे वजन हे १८ किलोपेक्षा कमी असल्याने हा पूल सुटा करूनही सहजपणाने वाहून नेता येणे शक्य होणार आहे. ३० जवानांना हा पूल उभारण्यासाठी दोन तासांचा अवधी लागतो. पुरासारख्या नसíगक आपत्तीमध्येही या पुलाचा वापर करता येऊ शकतो. नुकत्याच काही नसíगक आपत्तींमध्ये या पुलांचा यशस्वी वापर झाला आहे. लष्कराबरोबरच निमलष्करी दल, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलालाही हा पूल उपयुक्त ठरेल. अ‍ॅल्युमिनियम संयुगांचा वापर करण्यात आला असल्याने हा पूल भक्कम असला तरी त्याचे वजन तुलनेने कमी आहे. या पुलाची चाचणी सियाचीनसह आसामचा सीमावर्ती भाग आणि अरूणाचल प्रदेशातील तवांग येथे घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी झाली असून मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी हे तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या टप्प्यावर आहे. त्यानंतर हे पूल लष्करी तुकडय़ांना वापरासाठी उपलब्ध होईल.