अनेकदा एखाद्या योजनेत पैसे गुंतवा आणि फायदा मिळवा अशा फसव्या जाहीराती आपण पाहतो. मोहापायी या जाहिरातींना बळी पडून अनेक जण पैसेही गुंतवून मोकळे होतात. मात्र, कालांतराने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते आणि त्यांच्यावर केवळ पश्चातापाचीच वेळ येते. असाच काहीसा पण वेगळा किस्सा पुण्यात घडला आहे. चक्क चंद्रावर जागा विकत देण्याच्या जाहिरातीला बळी पडत एका कुटुंबाने यासाठी पैसेही गुंतवले आणि अखेर फसवणूक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांकडे धाव घेतली.

पुण्यातल्या कोथरूड भागात राहणार्‍या राधिका दाते-वाईकर या महिलेने चंद्रावर ५० हजार रुपयात एक एकर जागा मिळणार म्हणून २००५ मध्ये एका कंपनीकडे पैसे भरले. मात्र, अद्याप त्यांना ना जागा मिळाली ना भरलेले पैसे. या घटनेला १३ वर्षे झाले असून आता त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडत असल्याने त्यांनी ही बाब माध्यमांसमोर उघड केली. आपली फसवणूक झाली असून संबंधीत कंपनीकडून ५० हजार रुपये परत मिळावेत यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

या प्रकाराविषयी वाईकर म्हणाल्या, चंद्रावर जागा मिळेल अशी जाहिरात २००५ मध्ये आपण टीव्हीवर पाहिली होती. ही कंपनी परदेशातील असून त्या कंपनीच्या जाहिरातीवर आपण विश्वास ठेवत बचत करून ठेवलेले सर्व ५० हजार रुपये ऑनलाईनच्या माध्यमातून त्या कंपनीला भरले. त्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला तुमची चंद्रावर जागा निश्चित झाल्याचे सांगण्यात आले तसेच याबाबत त्यांच्याशी पत्र व्यवहार देखील झाला होता. त्यानंतर काही महिने त्यांच्याशी बोलणे झाले. पण काही दिवसात हेल्पलाईन नंबर आणि फॅक्स नंबर देखील बंद झाला आहे. आता देखील त्या नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसून याप्रकरणी सायबर सेलकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, आमचा मुलगा १२ वीमध्ये असल्याने आता त्याच्या पुढील शिक्षणासाठी आम्हाला पैसे पाहिजेत. आम्ही मोहापायी भरलेले हे पैसे मिळाल्यास त्याचे शिक्षण पूर्ण होण्यास आम्हाला मदत होईल.