पुण्यातील भोसरीमध्ये निवडणुकीमुळे राजकारण तापले आहे. भोसरीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने निवडणूक प्रचाराला गालबोट लागले आहे. भोसरीत राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये किरकोळ कारणांवरुन झालेल्या वादाचे पर्यावसान मोठ्या वादंगात झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करत असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. गुरुवारी दुपारी प्रभाग क्रमांक ५ मध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यासाठी भोसरीतल्या अनेक उमेदवारांनी पोलीस स्थानकात ठिय्या मांडल्याने बराच वेळ तणावाचे वातावरण होते. या प्रकरणी भोसरी पोलीस स्थानकात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रभाग क्रमांक ५ हा अतिसंवेदनशील प्रभाग म्हणून जाहीर करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे उमेदवार अजित गव्हाने यांनी म्हटले आहे. दरम्यान भाजपने मारहाणीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. निवडणुकीत असे आरोप होतच असतात, असे भाजपच्या शहराध्यक्षांनी म्हटले आहे.