बारावीच्या परीक्षेमध्ये प्रवेश पत्रांमधील चुकांच्या पाश्र्वभूमीवर दहावीच्या परीक्षेच्या प्रवेश पत्रांबाबत आधीपासूनच काळजी घेण्यात येत असल्याचे राज्य मंडळाकडून सांगण्यात येत आहे. दहावीच्या प्रवेश पत्रांमधील सर्व त्रुटी सुधारण्यात आल्या असून ज्या विभागांमध्ये प्रवेशपत्रे मिळालेली नाहीत, त्या विभागातील विद्यार्थ्यांना सोमवारपासून प्रवेशपत्रे मिळण्यास सुरुवात होईल.
राज्यात दहावीची लेखी परीक्षा ३ मार्चपासून सुरू होत आहे. या परीक्षेची प्रवेशपत्रे राज्यातील सर्व विभागांमध्ये येत्या चार दिवसांमध्ये मिळतील, असे राज्य मंडळाकडून सांगण्यात आले आहे. परीक्षेच्या तोंडावर राज्य मंडळाकडून परीक्षेचे साहित्य आणि प्रवेशपत्रे न मिळाल्यामुळे मुख्याध्यापक संघाकडून लेखी परीक्षेनंतर तोंडी परीक्षा घेण्याची सूचना राज्य मंडळाला करण्यात आली होती. त्या पाश्र्वभूमीवर दहावीच्या तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा प्रवेशपत्राशिवाय घेण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या होत्या. परीक्षेच्या आदल्या आठवडय़ापर्यंत प्रवेशपत्र न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता होती. मात्र, या आठवडय़ामध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे मिळतील असे राज्य मंडळाकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील मुंबई वगळता बाकी सर्व विभागांना प्रवेशपत्रे देण्यात आली असून मुंबई विभागाला सोमवारी प्रवेशपत्रे पाठवण्यात येणार आहेत, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले.
बारावीच्या परीक्षेमध्ये प्रवेशपत्रांमध्ये मोठय़ा प्रमाणावर चुका आढळून आल्या होत्या. यावर्षी प्रथमच राबवण्यात आलेल्या ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याच्या प्रणालीमधील त्रुटींमुळे प्रवेशपत्रांमध्ये चुका झाल्याचे मंडळाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, दहावीच्या प्रवेशपत्रांमधील चुका सुधारण्यात आल्या असल्याचेही राज्य मंडळाकडून सांगण्यात येत आहे.
‘‘राज्यातील ४ विभागांना दहावीची प्रवेशपत्रे मिळाली नव्हती. मात्र, आता सर्व विभागांना प्रवेशपत्रे पाठवण्यात आली आहेत. मुंबई विभागाची प्रवेशपत्रे सोमवारी पाठवण्यात येणार आहेत. प्रवेश पत्रांमध्ये काही चुका आढळल्यास किंवा काही शंका असल्यास विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा. त्याबाबतचे अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत.’’
– गंगाधर मम्हाणे, अध्यक्ष, राज्यमंडळ