02 March 2021

News Flash

महात्मा गांधींना पुणे नगरपालिकेचे मानपत्र

राज्यकर्त्यां इंग्रजांकडून आणि तेव्हाच्या सनातन्यांकडून विरोध झाल्यानंतर देखील महात्मा गांधी यांना पुणे नगरपालिकेने मानपत्र देऊन त्यांचा खास सन्मान केला होता.

| June 25, 2014 03:30 am

राज्यकर्त्यां इंग्रजांकडून आणि तेव्हाच्या सनातन्यांकडून विरोध झाल्यानंतर देखील महात्मा गांधी यांना पुणे नगरपालिकेने मानपत्र देऊन त्यांचा खास सन्मान केला होता. तेव्हाच्या नगरपालिकेच्या कार्यालयात म्हणजे; सध्याच्या विश्रामबागवाडय़ात घडलेल्या त्या ऐतिहासिक घटनेला बुधवारी (२५ जून) ऐंशी वर्षे पूर्ण होत आहेत.
महात्मा गांधी १९३४ च्या जूनमध्ये पुण्यात आले असताना त्यांना मानपत्र देण्याचा ठराव नगरपालिकेने संमत केला होता. पुणे नगरपालिकेत १९३२ ते १९३५ या कालावधीत ५१ सदस्य होते. मात्र या मानपत्र देण्याच्या निर्णयाला तेव्हाच्या राज्यकर्त्यां इंग्रजांनी विरोध केला. ‘महात्मा गांधी यांचा सत्कार करून आपण राजकारणात पदार्पण करणे अनुचित व नियमबाह्य़ आहे. अशा सत्कारसमारंभापासून आपण अलिप्त राहावे,’ असे तेव्हाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपालिकेला कळवले होते. तो स्वातंत्रलढय़ाचा  काळ होता आणि गांधीजी देशभरात स्वातंत्र्याचे आंदोलन चालवत होते. साहजिकच जिल्हाधिकाऱ्यांच्या या हरकतीकडे नगरपालिकेने दुर्लक्ष करून मंजूर झालेल्या ठरावाप्रमाणे मानपत्र प्रदानाचा भव्य कार्यक्रम पुण्यात घडवून आणला.
गांधींची तेव्हा अस्पृश्यता निवारणाची चळवळही सुरू होती. या चळवळीमुळे भारतीय संस्कृती विनाशाप्रत जाईल त्यामुळे त्यांचा सत्कार करणे म्हणजे पर्यायाने त्यांच्या अशा वर्तनाचा गौरव करण्यासारखे आहे, असा आक्षेप घेत तेव्हाच्या सनातन मंडळींकडूनही या मानपत्र सोहळ्याला विरोध झाला होता. मात्र, नगरपालिकेने त्याकडेही लक्ष दिले नाही. पुणे महापालिकेने पुणे नगरसंस्था शताब्दी ग्रंथ (संपादक: डॉ. मा. प. मंगुडकर) प्रसिद्ध केला आहे. या ग्रंथात मानपत्राच्या ठरावाचा इतिहास आणि कार्यक्रमाचेही सविस्तर वर्णन वाचायला मिळते.
मानपत्राचा हा कार्यक्रम २५ जून १९३४ या दिवशी आयोजित करण्यात आला होता. तेव्हाचा नगरपालिकेचा कारभार विश्रामबागवाडय़ातून चालत असे. कार्यक्रमासाठी गाडीतून उतरून गांधी विश्रामबागवाडय़ाकडे चालले होते. त्याचवेळी या वाडय़ाच्या कोपऱ्यावर असलेल्या पुष्करणी हौदाजवळ एका गावठी बॉम्बचा स्फोट झाला. त्यातून गांधी बचावले. या स्फोटात ल. ब. भोपटकर हे जखमी झाले. मात्र, कार्यक्रमाचा विरस होऊ नये म्हणून त्यांनी ही बातमी बराच काळ कोणाला कळू दिली नाही. प्रत्यक्ष मानपत्रात महात्माजींच्या अस्पृष्यतानिवारण कार्याचा गौरव करण्यात आला होता आणि हे मानपत्र खादीवर छापण्यात आले होते. ते सोन्याचा मुलामा दिलेल्या पेटीतून गांधींना अर्पण करण्यात आले होते. या पेटीवर सरस्वतीची सुंदर मूर्ती होती.

मनाई हुकुम असूनही आपण मानपत्र आग्रहपूर्वक देण्याचा प्रयास केला याबद्दल मी आपल्या नगरपालिकेचे प्रथम आभार मानतो. माझ्या मुक्कामातही सात-आठ हरिजन वस्त्यांना भेटी दिल्या. तेव्हा त्यांची घरे कोंबडय़ा व मेंढय़ा यांना राहावयाच्या जागेसारखी असलेली माझ्या दृष्टीस पडली. ही गोष्ट पुणे शहर नगरपालिकेला शोभण्यासारखी नाही. त्यांना कर्जे देऊन त्यांच्या राहण्याची स्थिती प्रथम सुधारा. या बाबतीत सभासदांनी नागरिकांचे साहाय्य घेऊन भरीव कार्य करावे.
– महात्मा गांधी
(२५ जून १९३४ रोजी पुणे नगरपालिकेत केलेले भाषण)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2014 3:30 am

Web Title: testimonial to mahatma gandhi by pune muncipality
Next Stories
1 सचिन ट्रॅव्हल्सला ग्राहक मंचाचा दणका
2 खास व्यसनमुक्तांसाठी नोकरीविषयक संकेतस्थळ सुरू होणार
3 लक्ष्मण माने यांची स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा
Just Now!
X