उद्धव ठाकरे सरकार हे अहंकारी सरकार असून आमच्या सूचनांची ते दखल घेत नाही. आमच्या सूचना जर सरकारने घेतल्या असत्या तरी खूप प्रश्न मार्गी लागले असते, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. राज्यातील करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर भाष्य करताना ते बोलत होते.

दरेकर म्हणाले, पुणे हे आपलं सांस्कृतिक वैभव असणार शहर आहे. पुणे तिथं काय उणं असं आपण नेहमी म्हणतो. मात्र, आज दुर्देवानं पुण्याचा करोनाच्या रुग्णसंख्येत वरचा क्रमांक आहे, ही आमच्यासाठी शरमेची गोष्ट आहे. खरतर सरकारनं वस्तुस्थिती जरी स्विकारली आणि विरोधी पक्षाच्या सूचना स्विकारल्या तर बरेचशे प्रश्न निकाली लागतील. परंतू हे सरकार एवढं अहंकारानं भरलेलं आहे. त्यांना लोकांच्या जीविताचं आणि उपाययोजनांच पडलेलं नाही.”

“आपला इगो आणि आपल्यातला विसंवाद याच्याभोवतीच सरकारमधील नेतेमंडळी फिरत आहेत. एकीकडं आम्ही सांगतो ऑक्सिजनचे बेड नाहीत तर ते सांगतात ऑक्सिजन आहे. व्हेंटिलेटर कमी असल्याचं सांगितल्यावर ते ही पुरेसे आहेत अस सांगतात. रेमडेसिविअरबाबत मीडियाचे लोक खरी परिस्थिती सांगत आहेत तर ते म्हणतात औषध पुरवठा सुरळीत आहे. ही वस्तुस्थिती असताना आपण ती कबूल का करत नाहीत?,” असा सवालही दरेकर यांनी केला आहे.

आणखी वाचा- मुंबईची झाली तुंबई, खरंच त्यांनी करुन दाखवलं; दरेकरांचा शिवसेनेवर निशाणा

“आम्ही कधीच म्हटलेलं नाही करोना तुमच्यामुळे आला, पण आम्ही व्यवस्थेतील दाखवलेले दोष मान्य करुन उपाययोजना करायच्या सोडून विरोधीपक्ष राजकारण करतंय, सरकार पाडायला निघालंय असं म्हणायचं. अशा विविधप्रकारे कोविडच्या विषयाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न अट्टाहास सत्ताधारी पक्षाचा आहे. सरकारला करोनावर नियंत्रण करणं जमलं नाही यामध्ये त्यांना शंभर टक्के अपयश आलंय, नियोजनात हे सरकार फेल झालंय,” असंही दरेकर यावेळी म्हणाले.