लोणावळ्याजवळील कुणे पुलाजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या शिवनेरी बसला अचानक लागलेल्या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. या बसमधील प्रवाशांना तत्काळ खाली उतरवल्यामुळे सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शनिवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली.
खंडाळा महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  बारामती डेपोची ठाण्याहून बारामतीला शिवनेरी बस निघाली होती. खंडाळा घाटमाथा ओलांडल्यानंतर लोणावळ्याजवळील कुणे पुलाजवळ अचानक बसला आग लागली. या मार्गाने जाणाऱ्या एका वाहन चालकाने बस चालकाला आग लागल्याची माहिती दिली. चालक पी. डी. कवडे व वाहक ए. बी. बुटे यांनी प्रसंगावधान राखत बस सव्र्हिस लेनवर उभी केली.  या बसमध्ये ४२ प्रवासी होते.  त्यांना घटनेची माहिती देत खाली उतरण्यास सांगितले. प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन साहित्याची पर्वा न करता बसमधून उडय़ा मारल्या. प्रवाशांचे दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी या घटनेतून सुखरूप वाचले. प्रवासी खाली उतरल्यानंतर काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. या घटनेची माहिती कळताच खंडाळा महामार्गाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कुळकर्णी, अल्ताफ पठाण, दिलीप कुरंदळे, सुधाकर िशदे आणि आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची पाहणी करुन आग विझविण्यासाठी आयआरबीच्या अग्निशमन दलाला कळविले. खबरदारी म्हणून या मार्गाने जाणारी वाहतूक काही काळ थांबविण्यात आली होती. दहा मिनिटात आयआरबीचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्याने आग आटोक्यात आणल्यानंतर या मार्गावरील वाहतूक दोन लेनवरून सुरू केली. या आगीत संपूर्ण बससह प्रवाशांचे साहित्य खाक झाले. वाढत्या गरमीने व इंजिन गरम होऊन ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली गेली आहे. बसमधील प्रवाशांना चालक व वाहक यांनी महामंडळाच्या इतर प्रवासी बसमध्ये बसवून देले. लोणावळा डेपोचे वाहतूक नियंत्रक व्ही. व्ही. धुमाळ यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहेत.