News Flash

चोरलेले ‘ते’ बालक विकले होते नव्वद हजारांना!

महिलेला बिगारी काम देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडील तीन महिन्याचे बालक चोरून नेणाऱ्या दाम्पत्याला

| November 4, 2013 03:00 am

महिलेला बिगारी काम देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडील तीन महिन्याचे बालक चोरून नेणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी अखेर जेरबंद केले. मित्रमंडळ चौक परिसरात २३ ऑक्टोबरला ही घटना घडली होती. चोरलेले बालक या दाम्पत्याने दुसऱ्या एका दाम्पत्याला नव्वद हजार रुपयांत विकले होते. बालक विकत घेणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मनीष महेशकुमार गांधी (वय ४०), परेशा मनीष गांधी (वय ३५, दोघे रा. ४/३०, कृष्णकुंज सोसायटी, पुलगेट, लष्कर) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून चोरलेले बालक विकत घेणारे सुप्रिया नवीन गुडीकुंडुला (वय ३४), नवीन कुडीकुंडुला (वय ४०, दोघे रा. बाळकृष्ण सोसायटी, धनकवडी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती परिमंडल दोनचे पोलीस उपायुक्त रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
परभणीतील पिंपळीकोथळा येथील रहिवाशी असलेली रेखा राजू पारधी (वय २४) ही महिला पती व तीन मुलांसह भावाकडे पुण्यात आली होती. उंड्रीहून ती कात्रजला आली. मात्र पती दारू पिण्यासाठी निघून गेला व बराच वेळ आला नाही. रस्त्यालगत पदपथावर ती तीन महिन्याच्या बालकासह उभी होती. त्या वेळी मनीष व परेशा तेथे आले. त्यांनी गप्पांमधून रेखाचा विश्वासजिंकला व तिला बिगारी काम मिळवून देण्याचे आमिष दोघांनी दाखवले. पीएमपी बसने त्यांनी रेखाला स्वारगेट परिसरात आणले. माझ्या मैत्रिणीचे कार्यालय मित्र मंडळ चौकातील पाटील प्लाझामध्ये असल्याचे परेशाने तिला सांगितले. त्यामुळे ते तिला घेऊन पाटील प्लाझा इमारतीत गेले. तुला लहान मुलगा असल्याचे कळल्यावर ते कामावर ठेवणार नाहीत, असे सांगून परेशाने रेखाचे बालक स्वत:जवळ घेतले. त्यानंतर तिची नजर चुकवून मनीष व परेशा बालकासह पळून गेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रेखाने स्वारगेट पोलिसांकडे तक्रार दिली.
घटनेनंतर तातडीने तपासाला सुरुवात करण्यात आली. आरोपींची रेखाचित्रं तयार करण्यात आली. त्याचप्रमाणे घटनेच्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजही तपासण्यात आले. बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी बालाजीनगर परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलीस उपायुक्त पोकळे, सहायक आयुक्त वसंतराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद कठाणे, कर्मचारी योगेश जगताप, संतोष क्षीरसागर, अमोल पांडे, विठ्ठल पाटील, शकील शेख अमजद पठाण, नितीन तेलंगे, विकास बनकर, कविता शिंदे आदींनी ही कारवाई केली.
तीन लाखांत सौदा करून बालक चोरीची तयारी
चोरलेले बालक खरेदी करणारी सुप्रिया गुडीकुंडुला ही पूर्वी लष्कर परिसरात राहत होती. आरोपी परेशा व सुप्रिया यांचे माहेरचे घर जवळ-जवळ असल्याने या दोघींचा परिचय होता. दहा वर्षांपूर्वी सुप्रियाचा विवाह झाला होता. मात्र, मूल होत नसल्याने ती निराश होती. घटनेच्या तीन महिन्यांपूर्वी परेशा व तिच्या पतीने सुप्रिया व तिच्या पतीला मुलगा मिळवून देतो, असे सांगितले. त्यासाठी तीन लाख रुपये खर्च येईल, असेही त्यांनी सांगितले होते. या दोघांनी त्यांच्याकडून ९० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर परेशा व मनीष यांनी बालकाचा शोध सुरू केला होता. त्यात त्यांना रेखा पारधी हिचा मुलगा मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2013 3:00 am

Web Title: that child was sold for 90000 couple arrested
Next Stories
1 पुणे विद्यापीठाकडे ५८ नव्या महाविद्यालयांचे प्रस्ताव
2 आठवीच्या अभ्यासक्रमावरील चाचणीत नववीतील ६५ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण
3 औंधमधील ‘मेट्रो ब्लड बँक’साठी अजून प्रतीक्षा
Just Now!
X