News Flash

मंडईच्या शारदा गजानन मंदिरातील ४३ लाखांची आभूषणे चोरणारास अटक

श्री शारदा गजानन मंदिरात प्रवेश करून ४३ लाख रुपये किमतीचे दागिने चोरणारा आरोपी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांच्या हाती लागला आहे.

| July 10, 2015 03:22 am

शहराच्या मध्य वस्तीतील अखिल मंडई मंडळाच्या श्री शारदा गजानन मंदिरात प्रवेश करून ४३ लाख रुपये किमतीचे दागिने चोरणारा आरोपी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पोलिसांच्या हाती लागला आहे. आरोपीच्या वडिलांनीच मुलाने चोरलेले दागिने कोथरूड पोलिसांकडे आणून दिल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात गुरुवारी दुपारी नळ चोरताना हा चोरटा आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत तो मंदिरातील दागिन्यांच्या चोरीतील आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. आरोपीला गांजा व दारुचे प्रचंड व्यसन असून, त्यासाठीच ही चोरी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले.
तानाजी नारायण कुंडले (वय ३५, रा. कोथरूड) असे या आरोपीचे नाव आहे. कुंडले हा बुधवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास मंदिरात आला होता. मंदिराच्या महिरपीच्या काचा सिमेंटचा ब्लॉक मारून त्याने फोडल्या व मूर्तीला घालण्यात आलेला सोन्याचा हार, मंगळसूत्र, साखळी, पूजा साहित्य असा ४३ लाख रुपयांचा ऐवज घेऊन तो पसार झाला होता. मंदिरातील सीसीटीव्ही चित्रीकरणामध्ये ही सर्व घटना कैद झाली होती. त्यावरून पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्रही तयार के ले होते.
पोलिसांचा तपास सुरू असताना गुरुवारी सकाळी कुंडले याचे वडील नारायण कुंडले हे कोथरूड पोलीस ठाण्यात काही दागिने घेऊन दाखल झाले. आपल्या मुलाने हे दागिने आणले असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलिसांनी मंदिरात चोरी करणाऱ्याचे रेखाचित्र त्यांना दाखविले. हे रेखाचित्र आपल्या मुलाचेच असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलीस तातडीने कुंडले यांच्या घरी गेले. मात्र, त्या ठिकाणी तानाजी सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, दुपारच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात असलेला एक नळ काढण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी एकाला पकडले. तो मद्यधुंद अवस्थेत होता. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, नळ चोरणारी हीच व्यक्ती मंदिरातील दागिने चोरीतील आरोपी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी मंदिरातील दागिन्यांच्या चोरी प्रकरणी त्याला अटक केली.

तो रात्री दागिने घालून घरी गेला
पहाटे मंदिरातील दागिन्यांची चोरी केल्यानंतर आरोपी तानाजी कुंडले हा मद्यपान करून घरी गेला होता. चोरलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने त्याने गळ्यात घातले होते. त्यामुळे वडिलांनी त्याला या दागिन्यांबाबत विचारले. मात्र, त्याने काहीच उत्तर दिले नाही. मुलाने हे दागिने चोरून आणल्याची वडिलांना खात्री झाली. त्यामुळे गुरुवारी सकाळी मुलाला काहीही कळू न देता त्यांनी हे दागिने घेऊन कोथरूड पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर सर्व प्रकार उघड झाला. आरोपी तानाजीचे वडील रिक्षा चालक आहेत. तानाजी हा काही दिवसांपूर्वी प्लंबिंगची कामे करीत होता. मात्र, काही दिवसांपासून तो काहीही कामधंदा करीत नव्हता. त्याला दारू व गांजाचे प्रचंड व्यसन असल्याने त्यासाठीच तो चोऱ्या करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2015 3:22 am

Web Title: that thief arrested
Next Stories
1 निराधार एचआयव्हीग्रस्ताला तरुणाईमुळे आसरा!
2 विठुनामाच्या गजरात शनिवारी रोजा इफ्तार
3 शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी काँग्रेसचा धडक मोर्चा
Just Now!
X