”अनिल देशमुखांना आव्हानं स्वीकारायला आवडतात, म्हणून गृहखातं स्वीकारलं” असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. तसेच, एल्गार परिषद प्रकरणी बोलताना त्यांनी हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून अधिकाऱ्यांकडून सगळी माहिती घेऊन तसेच, शरद पवार यांच्याशी देखील चर्चा करून पुढील भूमिका ठरवणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख हे पुण्यात आले होते, यावेळी त्यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला.

यावेळी नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर देखील भाष्य केले. नागपूर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील पाच वर्षांमध्ये मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं असूनही शहराचा नावलौकिक क्राईम सिटी म्हणून झाला. आता कठोर पावले उचलून शहराला त्याचा पूर्वीचा लौकिक पुन्हा मिळवून देऊ. तसेच राज्यातील सगळ्यात मोठ्या शहरांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? याचा आढावा घेऊन त्याप्रमाणे कारवाई केली जाईल, असं देखील देशमुख यांनी यावेळी सांगितले.

‘जेएनयू’ हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख  म्हणाले की,
या घटनेनंतर काल रात्री वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून मुंबईतील आंदोलनाबाबतची माहिती घेतली आहे. तसेच, राज्यभरातील आंदोलनाचा देखील आढावा घेतला जात आहे.