भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचे गंभीर पडसाद राज्यभरात उमटलेले बघायला मिळाले. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी औरंगाबाद, परभणी या ठिकाणी जमावाच्या संतप्त प्रतिक्रिया बघायला मिळाल्या. दरम्यान भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्या (बुधावार) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तसेच या हिंसाचाराला हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे आणि शिवराज प्रतिष्ठानचे संभाजी भिडे जबाबदार असल्याचाही आरोप केला.

त्यानंतर मिलिंद एकबोटे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे. सोमवारी घडलेली घटना दुर्देवी आणि निंदनीय आहे. आंबेडकरी अनुयायांना त्रास सहन करावा याचाही मी निषेध करतो. काही संघटनांनी मला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा चालवला आहे. त्यांच्या आरोपात तथ्य नाही. मी आंबेडकरी अनुयायांसोबतच आहे असे स्पष्टीकरण मिलिंद एकबोटेंनी दिले आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

पाहा व्हिडिओ

भीमा कोरेगाव या ठिकाणी सोमवारी दुपारच्या सुमारास हिंसाचाराची घटना घडली. त्यानंतर या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. सोमवारी भीमा कोरेगाव परिसरात लागू करण्यात आलेली संचारबंदी अजूनही कायम ठेवण्यात आली आहे. या घटनेचे पडसाद दिवसभर राज्याच्या विविध भागात बघायला मिळाले. या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल असेही स्पष्ट केले आहे.

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या हिंसाचारामागे दोन हिंदुत्त्ववादी संघटना असल्याचा आरोप केला. मात्र मिलिंद एकबोटे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून आमच्यावर होणाऱ्या आरोपांमागे फक्त बदनामीचा उद्देश असल्याचे म्हटले आहे.