पिंपरी – चिंचवड शहरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. शहरातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना देहू रोड परिसरात दोन मुलींना करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. यानंतर अधिक उपचारासाठी प्रशासकीय रुग्णवाहिका या मुलींना घेऊन जाण्यासाठी आली. मात्र, संबंधित मुलींच्या कुटुंबीयांनी आमच्या मुली करोनाबाधित नाहीत, असं म्हणत त्यांना जाऊ देण्यास विरोध केला. त्यामुळे रुग्णवाहिकेबरोबर आलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना तसेच विनारुग्ण माघारी परतावे लागले. ही घटना शनिवारी रात्री देहू रोड परिसरात घडली.

मात्र, आज (रविवारी) दुपारी त्यांना पोलीस बंदोबस्तात घेऊन जात साडेबाराच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

पिंपरी – चिंचवड शहरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. दररोज शेकडो नवीन रुग्ण आढळत आहेत. दरम्यान, देहुरोड येथील पारशी चाळमधीन दोन मुलींचा करोनाबाधित असल्याचा अहवाल आला. त्यानुसार प्रशासकीय रुग्णवाहिका दारात त्यांना घेऊन जाण्यासाठी आली. परंतु, आमच्या दोन्ही मुली करोनाबाधित नाहीत असे म्हणून उपचार घेण्यास त्यांच्या वडिलांनी विरोध केला. यामुळे रुग्णवाहिका परत गेली. मात्र, दोन्ही मुली पॉझिटिव्ह असल्याने त्यांना पुन्हा आज सकाळी घेऊन जाण्यास पोलीस आणि रुग्णवाहिका आली. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर अखेर दोन्ही मुलींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यास नेले. अशी माहिती प्रशासकीय अधिकारी सावंत यांनी दिली आहे.