‘आणखी पु. ल.’चे आज प्रकाशन

गोव्याच्या भूमीचे नंदनवन कवितेतून मांडणारे कविवर्य बा. भ. बोरकर उर्फ बाकीबाब यांची कविता म्हणजे मराठीतील लावण्यच. पुलं आणि त्यांचा स्नेहबंध या लावण्याचाच एक सुंदर आविष्कार होता. पुलंनी पाठवलेल्या एका पत्राला दिलेल्या उत्तरात त्यांनी लिहिले आहे,‘केवळ तुमचे पत्र वाचून इथे मला अक्षरश: नशा चढली आहे आणि पोळलेल्या संपातीला अंगभर पालवी फु टली आणि डोळ्यांत पंखांची शक्ती आली तसे मला झाले. तुमची असली पत्रे तिथल्या साकिंना वाचायला देऊ नका – अगदी चुकून देखील.’

अशा अनेक सुंदर पत्रसंवादाचा खजिना ‘आणखी पु. ल.’ या ‘लोकसत्ता’तर्फे आज प्रकाशित होणाऱ्या विशेषांकात   वाचायला मिळणार आहे. या प्रकाशनानिमित्त ‘शब्दवेध’ या संस्थेतर्फे सादर होणाऱ्या ‘अपरिचित पु. ल.’ या विशेष कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी साडेसहा वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे.

बाकीबाब यांनी पुलंना लिहिलेल्या या पत्रात लिहिले आहे, ‘जिथे या वयात देखील रुद्राक्ष संस्कृतीत वाढलेला ‘बाकी’ तुमच्यावर असा आशिक होतो. त्या द्राक्षदेशांतील हळुवार ‘साकी’ तुमच्या गळ्यात पडली, तर नवल कसले? त्यातल्या त्यात तुमची संरक्षक देवता तुमच्याबरोबर आहे हा दिलासा. हे बरे आहे. तुमच्या पॅरिसच्या कथा ऐकून त्या लिहिताना तुम्ही बोलता आहात असेच वाटते. माझे मन फुलारून आले आहे!’

पुलंनी लिहिलेली आणि त्यांनी लिहिलेली निवडक पत्रे हे जसे या विशेषांकाचे वैशिष्टय़ आहे, तसेच, पुलंवर लिहिलेल्या अनेक वेगळ्या लेखांचाही समावेश या अंकात करण्यात आला आहे. ‘मुश्किल बंदिश, पण यमनातली’ हा पुलंचे मैत्र जपलेल्या ख्यातनाम गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांनी लिहिलेला लेख, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांचा ‘ऐसे कठिण कोवळेपणें’ हा लेख वाचकांना पुलं आणि सुनीताबाई यांच्याबद्दलचे वेगळे पैलू उलगडून दाखवणारे आहेत.ह्ण

केव्हा – शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर

कुठे – टिळक स्मारक मंदिर,  पुणे

किती वाजता – सायं. साडेसहा वाजता

मुख्य प्रायोजक  – परांजपे स्कीम्स

सहप्रायोजक – चितळे बंधू मिठाईवाले, स्टोरीटेल, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.