भाजप सध्या काँग्रेस- राष्ट्रवादीच्या भलत्याच प्रेमात आहे. पंतप्रधानांपासून अनेक मंत्र्यांनी बारामतीला रांग लावली असून, वाट कशी लावायची याचे सल्ले घेतले जात आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या नाटय़ानंतर भाजप- राष्ट्रवादीची अभद्र युती उघड झाली आहे. या दोघांनाही धडा शिकवायला मतदार उत्सुक आहेत, अशी टीका जलसंपदा व संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली.
उन्ड्री येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवतारे बोलत होते. ते म्हणाले, की शिवसैनिकांनी नेहमीच मैत्रीधर्म पाळला. भाजपची ओझी सामान्य शिवसैनिकांनी वाहिली. भाजपने मात्र सेनेचा विश्वासघात केला. राज्यातील जनतेला आश्वासक वाटेल असा एकमेव नेता सध्या उद्धव ठाकरे आहेत. आगामी काळ शिवसेनेचा आहे. आगामी निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याच्या वक्तव्यांवर बोलताना ते म्हणाले, की जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका सेनेने यापूर्वी स्वबळावर लढविल्या आहेत. त्यामुळे स्वबळ आम्हाला नवे नाही. राहिला प्रश्न महापालिकेचा, पण शिवेना कोणाला सोबत घ्यायला उताविळ नाही. आव्हानात्मक स्थितीत शिवसेना आपली ताकद दाखवेल.
शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सत्यवान उभे, जिल्हाप्रमुख दत्तात्रय टेमगिरे, नगरसेविका कल्पना थोरवे, जिल्हा परिषद सदस्य दशरथ काळभोर, स्वाती टकले, बाजीराव सायकर, शंकर हरपळे आदी त्या वेळी उपस्थित होते.