जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना व्हायरसचे रुग्ण देशात झपाट्याने वाढत आहेत. महाराष्ट्रात करोना बाधिताचा आकडा 400 च्या पुढे गेला आहे.  ही संख्या वाढतच राहिली तर वैद्यकीय क्षेत्राशी निगडित साधनं पुरणार तरी कशी असा प्रश्न आहे. हे पाहता प्रशासनाने मास्कसह व्हेंटिलेटर निर्मितीसाठी कोणी प्रयत्न करू इच्छित असेल त्यांनी यावर काम करावं असं आवाहन केलं होतं. या पार्श्वभूमीवर माध्यमातून पिंपरी-चिंचवडमधील सोलर पॅनल क्लीनिंग रोबोटचं काम करणाऱ्या आयआयटी व अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या तरुणांनी सुरु केलेल्या कंपनीने स्वस्तात करोनाशी संबंधित असलेले व्हेंटिलेटर तयार केलं आहे. याची किंमत ५० ते ७० हजार रुपयांपर्यंत आहे. २० ते ३० हजार व्हेंटिलेटर बनवण्याचा मानस असल्याची माहिती हर्षित राठोड यांनी दिली आहे.

आयआयटी आणि इंजिनिअर तरुणांनी एकत्र येत स्वस्तात करोनावर मात करणार व्हेंटिलेटर तयार केले आहे. निखिल कुरळे, हर्षित राठोड (संस्थापक), तुषार अग्रवाल, अभय पुरोहीत, मयूर चाटे, अभिषेक कुलकर्णी अशी या तरुणांची नाव आहेत. यातील काहीजण सध्याच्या लॉकडाउनमुळे वर्क फ्रॉम होम करत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये यांची सोलर पॅनल क्लीनिंग रोबोटच काम करणारी कंपनी आहे.

सध्या जगभरात आणि देशात थैमान घातलेल्या करोना विषाणू संबंधी या तरुणांना जाण आहे. त्यामुळे त्यांनी व्हेंटिलेटर तयार करण्यावर भर दिला. यांनी व्हेंटिलेटरचे दोन मॉडेल (सॅम्पल) तयार केले आहेत. याबाबत बोलताना हर्षित म्हणाले,  आम्ही सर्व परवानगी घेऊन व्हेंटिलेटर निर्मितीसंदर्भात अभ्यास केला. त्यानंतर एक मॉडेल देखील तयार केले. यात करोना  विषाणू वरील उपचारासंदर्भात जास्त भर देण्यात आला. हे समोर ठेवून हे व्हेंटिलेटर तयार करण्याचं काम सुरू केलं आहे. २० ते ३० हजार व्हेंटिलेटर तयार करण्याचा टीमचा मानस आहे. त्याअगोदर त्याची केमिकल ट्रायल करणार आहोत अशी माहितीही त्यांनी दिली आहे. एक महिनानंतर याची सर्व प्रक्रिया पूर्ण होईल अस त्यांचं म्हणणं आहे.