”संपूर्ण अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, परंतु सरकार तीन पक्षांच आहे. तीन पक्षांच सरकार ज्यावेळी असतं त्यावेळी काँग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आहेत याचबरोबर शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे काम बघत आहेत. या तिघांमध्ये साधारण ठरलेलं आहे व ३० तारखेला शपथविधी ठरला आहे. यादिवशी कोण शपथ घेणार यासंदर्भात शिवसेनेची नावं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम करतील, राष्ट्रवादीची नावं शरद पवार तर सोनिया गांधी काँग्रेसची नावं अंतिम करतील”, असं अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या एक प्रश्नाला उत्तर देताना, पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

पक्ष देईन ती जबाबदारी सर्व आमदारांप्रमाणे मी पार पाडणार असल्याचे सांगत, आणखी एखादं महत्वाचं खातं राष्ट्रवादीला मिळण्याची दाट शक्यता असल्याचेही अजित पवार यांनी म्हटलं आहे. याद्वारे त्यांनी राष्ट्रवादीला गृहमंत्रिपद मिळणार असल्याचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे.

तसेच, वसंत दादा शुगर इन्स्टिटय़ुटच्या कार्यक्रमा दरम्यान जागा बदलुन घेण्याबाबत बोलताना त्यांनी , सध्या मी साधा आमदार असल्याने प्रोटोकॉल नुसार स्वतहून जागा बदलून घेतली. थेट मुख्यमंत्र्यांच्याशेजारी बसणं प्रोटोकॉलला धरून नव्हतं, असं सागंताना हर्षवर्धन पाटील आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत, हे देखील स्पष्ट केलं.

तर, हिवाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली होती. शिवसेना-राष्ट्रवादी यांची यादी तयार असून काँग्रेसमध्ये मंत्रिपदावरून खल सुरु असल्याने विस्तार लांबल्याचं बोललं जातं आहे.