राज्यातल्या पुणे विभागातील पाच पूरग्रस्त जिल्ह्यांमधील पूरबळींचा आकडा हा ४३वर पोहोचला आहे. तर ३ जण बेपत्ता आहेत. त्याचबरोबर पुरामुळे संपर्क तुटल्याने ४६ गावांतील व्यवहार अद्यापही ठप्प आहेत, अशी माहिती पुणे विभागाचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी दिली आहे.

विभागीय आयुक्तांच्या माहितीनुसार, आजच्या (१२ ऑगस्ट) ताज्या आकडेवारीनुसार, पुणे विभागातल्या पाच जिल्ह्यांतील मिळून पुरबळींची संख्या ४३ वर पोहोचली आहे. तर ३ जण अद्यापही बेपत्ता आहेत. या जिल्ह्यांमधील ५८४ गावांतील ४,७४,२२६ लोकांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आले आहे. तर पूरग्रस्तांसाठी ५९६ तात्पुरत्या निवाऱ्यांची सोय करण्यात आली आहे.

पुरस्थितीमुळे ४६ गावांतील व्यवहार अद्यापही पूर्णपणे ठप्प आहेत. या गावांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विविध एजन्सीजचे १०५ बचाव पथके आणि १६४ बोटी अद्यापही कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मदतीसाठी तैनात आहेत. त्याचबरोबर पूरस्थिती कायम असल्याने पाचही जिल्ह्यातील ६६ पूल अद्याप वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले असल्याचेही विभागीय आयुक्तींनी सांगितले आहे.