पोलीस व नागरिकांमध्ये संवाद वाढावा यासाठी आज(शनिवार) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात झालेल्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय झाला. या निर्णयाबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः पत्रकारपरिषदेत माहिती दिली.

गृहमंत्री वळसे पाटील यांनी सांगितले की, “पोलीस आणि नागरिकांमध्ये संवाद वाढावा यासाठी आज आयुक्तालयात यावर आमची चर्चा झाली आणि निर्णय झाला, की प्रत्येक पोलीस स्टेशनच्या प्रमुखांनी महिन्यातून एकदा जनता दरबार घेतला पाहिजे. या जनता दरबारामधून जनतेची जी काय कैफियत असेल ती ऐकून घेतली पाहिजे, ती सोडवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे आणि त्याचं उत्तर देखील दिलं पाहिजे. मी नागरिकांना असं आवाहन करेन की, पोलिसांकडून जनता दरबाराची जी तारीख जाहीर केली जाईल, त्या अगोदरच जर आपले अर्ज संबंधित पोलीस स्टेशनकडे पाठवले, तर त्याचा अधीच अभ्यास करता येईल व जनता दरबारच्या दिवशी त्यावर कदाचित उत्तरही देता येईल.”

पंतप्रधान मोदी व शरद पवार यांच्या भेटीवर प्रतिक्रिया –

तसेच, “शरद पवार हे दिल्लीला गेलेले आहेत आणि सोमवारपासून संसदेचे अधिवेशन सुरू होणार आहे. तर त्या दृष्टीकोनातून नवीन कृषी कायदे, शेतकऱ्याचं आंदोलन अन्य काही प्रश्न आहेत. बँकींगचे प्रश्न आहेत, सहकाराचे प्रश्न आहेत. साधारण या प्रश्नांवर त्यांची पंतप्रधानांसोबत चर्चा झाली असेल असं मला वाटतं.” अशी प्रतिक्रिया गृहमंत्री वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचेअध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत दिली.

करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन-

याचबरोबर करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बोलताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, “माझं नागरिकांना हेच आवाहन राहणार आहे की, आता जगातल्या काही देशांमध्ये करोनाची तिसरी लाट आलेली आहे. आपल्याकडे देखील येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसं देश पातळीवरील टास्क फोर्सचे सदस्य आणि तज्ज्ञ यांनी जाहीर केलेलं आहे. काही संस्थांनी देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे माझी सर्वांना एवढीच विनंती आहे, की आपण अनावश्यक रस्त्यावर गर्दी करून अधिक तिसऱ्या लाटेला आमंत्रण देण्याची आपल्या हातून चूक घडू नये. यासाठी सर्वांनी कोविडचो जो प्रोटोकॉल आहे तो पाळला पाहिजे आणि कमीत कमी गर्दी रस्त्यावर केली पाहिजे. पर्यटकांसाठी देखील हेच आवाहन आहे. त्यांनी देखील काही दिवस संयम पाळला पाहिजे.”