बोपखेलचा तिढा
बोपखेलचा रस्ता तसेच पुलासंदर्भात नव्याने निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील शिष्टमंडळ लवाजम्यासह पुण्यात गेले खरे; मात्र समन्वयाच्या अभावामुळे पर्रिकरांची भेट झाली नाही आणि सर्वाना हात हलवत परत यावे लागले.
सोमवारी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली बोपखेलच्या प्रश्नासाठी पिंपरी पालिकेत बैठक झाली. लष्कराच्या आडमुठी भूमिकेमुळे कोणताही ठोस तोडगा बैठकीत निघू शकला नाही. त्यामुळे संरक्षणमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दाद मागण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. यापूर्वी, पर्रिकर यांनी बोपखेलसाठी वेळोवेळी बैठका घेतल्या असल्याने त्यांना या प्रश्नाची पुरेपूर माहिती आहे. पर्रिकर मंगळवारी सकाळी पुण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्याशी संपर्क साधून विमानतळावरच भेट घेण्याचे ठरले. त्यानुसार, मंगळवारी भल्या सकाळी खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, आयुक्त दिनेश वाघमारे, बोपखेलचे नगरसेवक चंद्रकांता सोनकांबळे, संजय काटे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थांचे प्रतिनिधी विमानतळावर आले. मात्र, कोणाशीही पर्रिकरांची भेट होऊ शकली नाही. ते हवाई दलाच्या विमानाने आले व हेलिकॉप्टरने खडकवासल्याच्या दिशेने रवाना झाले. पिंपरी पालिकेचे शिष्टमंडळ एका बाजूला वाट पाहत थांबले तर पर्रिकर विरूध्द दिशेला होते. समन्वयाच्या अभावामुळे दोहोंमध्ये भेट होऊ शकली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र धावती भेट घेतल्याचे सांगण्यात आले. तथापि, त्यास दुजोरा मिळू शकला नाही. पुढे, पर्रिकर वध्र्याला रवाना झाले. त्यामुळे हे शिष्टमंडळ हात हलवत माघारी आले.