प्रशिक्षक नसताना श्वान खरेदीचा घाट; उपनिरीक्षकासह तिघांना दंडाची शिक्षा

पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक नाशक पथकात प्रशिक्षक (हँडलर) म्हणून पोलीस उपलब्ध असताना श्वान खरेदी करण्यात आले. दरम्यान, श्वान खरेदी केल्यानंतर साडेचार महिने प्रशिक्षक नेमण्यात आला नाही, तसेच प्रशिक्षकाच्या हलगर्जीमुळे श्वान प्रशिक्षणादरम्यान अपात्र ठरल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी उपनिरीक्षकांसह तिघांना दंडाची शिक्षा सुनावली आहे.

पुणे पोलिसांचे बॉम्बशोधक नाशक पथक शिवाजीनगर मुख्यालय परिसरात आहे. चोरी, खून, दरोडा तसेच स्फोटके शोधून काढण्यासाठी पोलिसांचे श्वान उपयुक्त ठरते. बॉम्बशोधक पथकातील श्वानांना प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी बॉम्बशोधक पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षक म्हणून नेमण्यात येते. बॉम्बशोधक पथकातील पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड यांनी श्वान प्रशिक्षक नसताना गेल्या वर्षी श्वान खरेदीचा प्रस्ताव ठेवला होता. ५ जुलै २०१७ रोजी जर्मन शेफर्ड जातीचे श्वान खरेदी करण्यात आले. श्वान खरेदी केल्यानंतर साडेचार महिने श्वानाला प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षक नेमण्यात आला नाही.

बॉम्बशोधक पथकात श्वान खरेदी केल्यानंतर त्याला प्रशिक्षण देणे गरजेचे असते. प्रशिक्षणाच्या माध्यमातून श्वानाचा व्यायाम होतो, तसेच ते अधिक तंदुरुस्त होते. त्यामुळे श्वानाची वाढ व्यवस्थित झाली नाही तसेच त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ते अशकत राहिले. श्वानाची देखभाल न केल्याने बॉम्बशोधक पथकातील उपनिरीक्षक प्रदीप जाधव, पोलीस शिपाई नितीन जगताप आणि नितीन गायकवाड यांना दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नितीन जगताप आणि नितीन गायकवाड यांची प्रशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

श्वान अपात्र कसे ठरले?

पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक पथकाने खरेदी केलेल्या जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानाच्या पिलाला राजस्थानमधील अलवार जिल्हय़ात असलेल्या श्वान प्रशिक्षण केंद्रात १९ नोव्हेंबर २०१७ रोजी पाठविण्यात आले होते. तेथे करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानाचे मागील बाजूचे दोन्ही पाय अशक्त असल्याचे उघडकीस आले होते. त्या वेळी पुणे पोलिसांच्या जर्मन शेफर्ड श्वानाला अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानंतर एप्रिल २०१८ रोजी चंदीगडमधील भारत-तिबेट सीमा पोलीस केंद्रात (आयटीबीपी ) प्रशिक्षणासाठी पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मूलभूत प्रशिक्षण वर्गासाठी पुण्यातील पशुवैद्यकीय रुग्णालयात जर्मन शेफर्ड श्वानाची पुन्हा तपासणी करण्यात आली. त्या वेळी देखील श्वान सक्षम नसल्याचे आढळून आले होते. श्वानाची देखभाल न करणे, व्यायाम तसेच संवर्धनाविषयी पुरेशी काळजी न घेतल्याने तो प्रशिक्षणासाठी अपात्र ठरल्याचे मत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नोंदविले. त्यामुळे श्वान पथकातील तिघा पोलिसांना दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.