लेखक-सामाजिक कार्यकर्ते विनय हर्डीकर यांची भूमिका

आणीबाणीमध्ये सत्याग्रह केल्याबद्दल निवृत्तिवेतन नको, अशी भूमिका प्रसिद्ध लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते विनय हर्डीकर यांनी घेतली आहे. वैयक्तिक, राजकीय आणि नैतिक कारणास्तव मी हे निवृत्तिवेतन स्वीकारण्यास नम्रपणे नकार देत असल्याचे हर्डीकर यांनी रविवारी स्पष्ट केले.

आणीबाणीतील सत्याग्रहींना निवृत्तिवेतन देण्याची घोषणा नुकतीच राज्य सरकारने केली आहे. आणीबीणीला विरोध म्हणून सत्याग्रह केल्याबद्दल हर्डीकर १४ जानेवारी ते ८ मार्च १९७७ या कालावधीत तुरुंगात होते. सरकारच्या निकषानुसार मला दहा हजार रुपये निवृत्तिवेतन मिळणार आहे. मात्र, मला हे निवृत्तिवेतन नको, असे हर्डीकर यांनी स्पष्ट केले.

आणीबाणी रद्द होऊन देशामध्ये लोकशाही नांदावी आणि आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधी यांना राजकीय शासन व्हावे या दोन उद्देशांसाठी मी वैयक्तिकरीत्या सत्याग्रह केला. मार्च १९७७ च्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधी यांचा पराभव झाल्यामुळे माझे हे दोन्ही उद्देश पूर्ण झाले. त्याहीपेक्षा स्वतंत्र देशात असा संघर्ष करावा लागणे ही अत्यंत खेदजनक गोष्ट होती. आता ४० वर्षांनंतर त्यासाठी मला काही नको, असे हर्डीकर यांनी सांगितले. दुसरी गोष्ट म्हणजे मी कशातूनही निवृत्त झालो नाही. त्यामुळे मला निवृत्तिवेतनाची गरज नाही. निवृत्तिवेतन देऊन मला ‘पेन्शनी’त काढू नये, अशी भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.

आणीबाणीतील सत्याग्रहींना निवृत्तिवेतन हा भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या ‘संपर्क आणि समर्थन’ मोहिमेचा एक भाग आहे. त्याला मी बळी पडू इच्छित नाही. २०१४ मध्ये सत्ता मिळाली तेव्हाही हे करता आले असते. मात्र, निवृत्तिवेतनाची आता घोषणा करण्यामागचा राजकीय हेतू स्पष्ट आहे, याकडे लक्ष वेधून हर्डीकर म्हणाले, आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना या सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे सरकारने निवृत्तिवेतन देणे आणि घेणाऱ्याने ते स्वीकारणे हे दोन्ही अनैतिक आहे. आणीबाणीच्या काळात स्थानबद्ध आणि सत्याग्रही असे दोन स्वरूपाचे लोक तुरुंगात होते. सत्याग्रहींमध्ये संघाचे लोक मोठय़ा संख्येने होते तसे जनसंघविरोधी लोकदेखील होते. त्यांचे काय? स्थानबद्धतेमध्ये आनंदमार्गी, समाजवादी, मुस्लीम जातीय संघटना आणि काही कथित नक्षलवादीदेखील होते. त्यांना निवृत्तिवेतन देण्यात येणार आहे का?, या सर्वाबद्दल स्पष्टता नाही. या साऱ्यांनाही संपर्क आणि समर्थन मोहिमेमध्ये ओढण्याचा डाव आहे? ‘स्वयंसेवक’ म्हणवणाऱ्यांनी सरकारकडून अशी खिरापत स्वीकारणे कोणत्या नैतिकतेमध्ये बसते?

या सरकारने अनेक घोषणा केल्या. लोक कार्यवाहीची वाट बघत आहेत. निवृत्तिवेतनासाठी पैसे खर्च करण्यापेक्षा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे पुनर्वसन, अंगणवाणी सेविकांचे प्रश्न, कुपोषित बालकांचा प्रश्न अशा विषयांमध्ये सरकारने पैसे खर्च करावेत, अशी अपेक्षा विनय हर्डीकर यांनी व्यक्त केली.