पुण्यातील शिवाजीनगर न्यायालय परिसरात उभारण्यात येणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस पुण्यात दाखल झाले आहेत. मात्र, न्यायालयाच्या प्रवेशद्वारासमोर पदपथावर उभारण्यात आलेले स्टॉल कापड़ी पडदा टाकून झाकण्यात आले आहेत. याद्वारे मुख्यमंत्र्यांना न्यायालय परिसरातील हे गजबजीचे दृश्य दिसता कामा नये याची काळजी आयोजकांनी घेतल्याचे दिसून येत आहे.

पुण्यात आज कौटुंबिक न्यायलयाचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, या न्यायालयासमोरील मुख्यमंत्र्यांना अतिक्रमण दिसू नये याचे देखील आयोजकांनी चांगल्या प्रकारे नियोजन केले आहे. कापडी पडदा लावून हा परिसर झाकण्यात आला आहे.

पुणे शहरातील शिवाजीनगर येथे उभारलेल्या कौटुंबिक न्यायालयाच्या नव्या इमारतीमध्ये विविध सुविधा देण्यात आल्‍या आहेत. ज्यामध्ये लहान मुलांना भेटण्यासाठी मुलांचे संकुल, पक्षकार, कर्मचारी व वकील यांच्या मुलांसाठी पाळणाघराची व्यवस्था, प्रतीक्षालय, दूरदर्शन संच, सुसज्ज ग्रंथालय, मानसोपचारतज्ज्ञ, बाल मानसोपचारतज्ज्ञ यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष यांचा समावेश आहे.

न्यायालयीन कक्षाची रचना देखील विशिष्ट पध्दतीने करण्यात आली आहे. ज्यामध्ये शारीरीकदृष्टया विकलांग, पक्षकारांसाठी रॅम्पची व्यवस्था आहे. या नूतन इमारतीमध्ये न्यायाधीश, वकिल व कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज असे भूमिगत वाहनतळ बांधण्यात आलेले आहे. नूतन इमारतीमुळे वकील, पक्षकार आणि कर्मचारी यांची सोय होणार आहे.