पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पहिल्या करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्याला कुटुंबासह आज डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी इतर पोलीस कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात करोनामुक्त पोलीस कर्मचाऱ्यास प्रोत्साहन दिले. तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागतही केले गेले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एकूण-८ पोलीस कर्मचारी आणि अधिकारी बाधित असून यापैकी ५ जणांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. सध्या तीन जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पहिला पोलीस कर्मचारी करोना बाधित असल्याचे काही दिवसांपूर्वी निदर्शनास आले होते. त्यानंतर त्याच्यासह कुटूंबाला करोना झाल्याचं निष्पन्न झाले होते. त्यानुसार त्यांच्यावर महानगर पालिकेच्या डॉक्टरांच्या सानिध्यात उपचार सुरू होते. अखेर त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून टाळ्यांच्या कडकडाटात उपचार सुरू असलेल्या ठिकाणाहून निरोप आणि राहात असलेल्या घरी स्वागत करण्यात आले.