कुठल्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना सहभागी होण्याची संधी

खगोलजीवशास्त्राचा देशातील पहिला प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात एका अमेरिकी संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात आला असून, यात विज्ञान विषयात कुतूहल असणाऱ्या कुठल्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. या अभ्यासक्रमाची पहिली दोन सत्रे पार पडली आहेत, अशी माहिती या अभ्यासक्रमाच्या संयोजिका प्राध्यापक रिबेका ठोंबरे यांनी दिली.

खगोलजीवशास्त्राविषयीचा हा अभ्यासक्रम सुरू करण्यात नासाचे वैज्ञानिक पराग वैशंपायन यांचा पुढाकार आहे. ते स्काइपच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात, तर काही व्याख्याने ही रिबेका ठोंबरे यांच्यासह इतर शिक्षक घेत आहेत. या विश्वात आपण एकटे आहोत का, पृथ्वीवर जीवसृष्टी कुठून आली व ती कशी उत्क्रांत झाली व बा अवकाशात दुसरीकडे कुठे जीवसृष्टी आहे का, असेल तर कुठल्या स्वरूपात आहे यावर या अभ्यासक्रमात व्याख्याने तर दिली जातातच, शिवाय गुगलच्या माध्यमातून काही प्रयोगही करून घेतले जातात असे रिबेका ठोंबरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

त्या म्हणाल्या, की जेव्हा अवकाश मोहिमा पाठवल्या जातात, त्यात जर पृथ्वीवरील जीवाणू चुकूनही वर गेले तर अवकाशात सूक्ष्मजीव आहेत की नाही या बाबत आपली निरीक्षणे चुकण्याची शक्यता असते, त्यामुळे या मोहिमातील उपकरणे र्निजतुक अवस्थेत पाठवावी लागतात. पुण्याचा मॉडर्न महाविद्यालयाच्या सहकार्याने खगोलजीवशास्त्राचा पहिला अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून, त्यात बारावी झालेल्या कुठल्याही शाखेच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. अभ्यासक्रमासाठी पहिल्या तुकडीत १० तर नंतरच्या तुकडीत २५ विद्यार्थी होते. पुढील अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू असून तो २८ ऑगस्टला सुरू  होणार आहे.  या अभ्यासक्रमासाठी दोन हजार रुपये शुल्क आकारण्यात येते. आंतरशाखीय अभ्यासक्रम हे त्याचे वैशिष्टय़ असून तो रोजगाराभिमुख नव्हे तर केवळ ज्ञानवर्धक अभ्यासक्रम आहे. गणित, भौतिकशास्त्र, जैवतंत्रज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र अशा अनेक शाखांतील विद्यार्थी पहिल्या तुकडीत सहभागी झाले होते.

मॉडर्न कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. एस. झुंजारराव यांनी सांगितले, की हा अभ्यासक्रम अभिनव असून, दोन आंतरराष्ट्रीय संस्थांचे सहकार्य यात आहे. दोन श्रेयांकांचा हा अभ्यासक्रम असून, त्यासाठी १०० गुणांची परीक्षा घेण्यात येते.

अभ्यासक्रमाचे स्वरूप

व्याख्याने व प्रात्यक्षिके

मंगळ व काही ग्रहांचा गुगल मॅपच्या मदतीने अभ्यास.

इस्रो व नासाच्या मोहिमांची शास्त्रीय माहिती.

सहयोगी संस्था— ब्लू मार्बल स्पेस इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स ( सियाटल, अमेरिका).

प्रवेशासाठी पात्रता व शुल्क.

बारावी उत्तीर्ण असलेले कुठल्याही शाखेचे विद्यार्थी.

शुल्क दोन हजार रुपये

कालावधी—१ आठवडा.