24 January 2021

News Flash

मूर्तिकार धोंडफळे घराण्याची चौथी पिढी कला क्षेत्रात

रास्ता पेठ येथे धोंडफळे स्टुडिओ ‘कुटुंब रंगलंय गणेश मूर्तीत’ची प्रचिती देणारे आहे.

गणपतीची मूर्ती रंगविण्यामध्ये अभिजीत धोंडफळे यांना मदत करताना दीप्ती धोंडफळे

गणरायाची मूर्ती रंगवण्यामध्ये दीप्तीची मोलाची मदत

सुबक आणि आकर्षक गणेशमूर्ती साकारण्याची गेल्या ७८ वर्षांची परंपरा असलेल्या मूर्तिकार धोंडफळे घराण्याच्या चौथ्या पिढीचे कला क्षेत्रात पदार्पण झाले आहे. प्रसिद्ध मूर्तिकार अभिजित धोंडफळे यांची कन्या दीप्ती महाविद्यालय सांभाळून गणरायाची मूर्ती रंगविण्यामध्ये वडिलांना मोलाची मदत करीत आहे.

रास्ता पेठ येथे धोंडफळे स्टुडिओ ‘कुटुंब रंगलंय गणेश मूर्तीत’ची प्रचिती देणारे आहे. मूर्तिकार नरेश मानसिंग धोंडफळे म्हणजे अभिजित धोंडफळे यांचे आजोबा यांनी ७८ वर्षांपूर्वी धोंडफळे स्टुडिओ सुरू केला. त्यांची ही परंपरा रवींद्र आणि अनिल या दोन मुलांनी पुढे नेली. आजोबा आणि वडील यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजित आणि अरिवद या दोघा बंधूंची कलात्मक जडणघडण झाली. अभिजित धोंडफळे आता पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मात्र, दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करताना धोंडफळे यांच्या कार्याचा गौरव केला. पंतप्रधानांनी केलेल्या गौरवानंतर या विषयाला गती मिळाली आणि विविध ठिकाणी शाडू मातीचे गणपती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यावर लक्ष केंद्रित केले, असे अभिजित यांनी सांगितले. मी एकटा किती मूर्ती साकारू शकतो. त्यापेक्षा पर्यावरणपूरक गणपती घडविणारे कारागीर घडविणे महत्त्वाचे वाटते, असेही त्यांनी सांगितले. अभिजित यांचे बंधू अरिवद गेल्या दहा वर्षांपासून आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

धोंडफळे यांची आई विजयालक्ष्मी या ५१ वर्षांपासून मूर्ती घडवीत आहेत. पत्नी उमा २० वर्षांपासून मला मदत करीत आहे. विश्वकर्मा इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे मेकॅनिकल इजिनिअिरगच्या दुसऱ्या वर्षांला शिक्षण घेत असलेली कन्या दीप्तीने यंदा गणेशमूर्ती रंगविण्यासाठी मदत केली. चौथी पिढी कला क्षेत्रात कार्यरत झाली, याचा वडील म्हणून मला आनंद आहे. ही दुर्मीळ गोष्ट बघायला मिळाली. रिंग टेनिस क्रीडा प्रकारामध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या संघामध्ये समावेश असलेल्या दीप्तीने गणरायाची सेवा करण्याचे ठरविले याचा मला अभिमान वाटतो, असे अभिजित धोंडफळे यांनी सांगितले.

वारसा पुढे नेण्याचा आनंद

धोंडफळे घराण्याचा  वारसा पुढे नेताना मी थोडेफार काम करू शकते, याचा आनंद वाटतो. कलेची परंपरा असलेल्या घरात जन्माला आल्यानंतर मी हेच करायला हवे, अशीच माझी भावना आहे, असे दीप्तीने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2018 3:40 am

Web Title: the fourth generation of sculptor dhondfale family in the field of art
Next Stories
1 ग्रंथोत्तेजनासाठी अर्थोत्तेजन हवे!
2 प्राधिकरण इमारतीमधील ‘स्कॅनर’सह ‘टच स्क्रिन’ही बंद
3 अग्निशामक प्रात्यक्षिकांतून विद्यार्थ्यांना संरक्षणाचे धडे
Just Now!
X