देशभरात या सरकारविरोधातले वारे वाहात आहेत. त्यामुळे अयोध्याचा मुद्दा उपस्थित केला गेला असून दंगली घडविल्याशिवाय सरकार येणार नाही. त्यामुळे आगामी काळात दंगली घडण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे. अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषण करताना जेव्हा मी पाहतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची चमक संपली आहे असेच मला आता दिसते असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचे अधिवेशन पुण्यात भारिप चे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी एमआयएम चे आमदार इम्तियाज जलील, लक्ष्मण माने तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की,या सरकारकडून देशात अयोध्येचा मुद्दा उपस्थित करण्यापूर्वी शहरी नक्षलवाद उपस्थित करण्यात आला आणि हे संकट मोडीत काढण्यासाठी आम्हाला निवडून द्या असेही आवाहन यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केले. शहरी नक्षलवादातून शहरातील नागरिकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण भाजपाकडून करण्यात आले आहे. काँग्रेसकडून प्रसार माध्यममधून सांगितले जाते की प्रकाश आंबेडकरानी एमआयएम ला सोडावं, इंडियन मुस्लिम लीगला केरळ मधून सोडा असे म्हटले का यातून काँग्रेस कोण सोबत आहे हे स्पष्ट होतंच आहे. देशाची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे भाजपाकडून सांगितले जात असून अरुण जेटली आरबीआयकडे का गेले होते. देशाची आर्थिक परिस्थिती खूप वाईट झाल्याने गेले होते का? याचे उत्तर त्यांनी देशाला द्यावे असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

यावेळी एमआयएम चे आमदार इम्तियाज जलील यांनीही भाजपावर टीका केली. मागील चार वर्षात भाजपकडून देशात विकास कामे करण्यात अपयशी ठरल्याने आता राम मंदिराचा मुद्दा पुढे करून जनतेचे लक्ष वेधण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकारकडून केले जात आहे. तसेच देशात मागील काही दिवसांपासून संविधान बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या विरोधात सर्वानी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
तर ते पुढे म्हणाले की, मुस्लिमांना दुसर कोणी हरवले नाही तर मुस्लिमांनीच हरवले असून दलितांना देखील दलितांनीच हरवले आहे. त्यामुळे आता सर्वानी सत्तेसाठी एकजूट व्हा जाती-धर्माच्या नावे वेगळे होऊ नका असेही त्यांनी म्हटले आहे.